सुपर ७५० दर्जाच्या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीने काल मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत पुन्हा एकदा ‘टॉप १०’मध्ये स्थान मिळविले आहे. मागील आठवड्यात ११व्या स्थानावर असलेल्या सात्विक-चिराग जोडीने दोन स्थानांची प्रगती करत नवव्या स्थानावर हक्क सांगितला आहे.
पुरुष एकेरीत समीर वर्मा व पारुपल्ली कश्यप यांनी प्रत्येकी एका स्थानाची सुधारणा करत अनुक्रमे १७वा व २५वा क्रमांक मिळविला आहे. दोन स्थानांच्या घसरणीसह एचएस प्रणॉय २९व्या स्थानी पोहोचला आहे. शुभंकर डे याने चार स्थानांची उडी घेत ३८वा क्रमांक प्राप्त केला आहे. फ्रेंच ओपनमधील असमाधानकारक कामगिरीनंतरही पीव्ही सिंधू व सायना नेहवाल यांनी महिला एकेरीतील आपले सहावे व नववे स्थान राखले आहे. रिया मुखर्जी (-१, ८३वे स्थान), साई उत्तेजिता राव चुक्का (-१, ८९वे स्थान) व वृशाली गुम्माडी (-२, ९८वे स्थान) यांना तोटा झाला आहे. गोव्याची अनुरा प्रभुदेसाई १०५व्या क्रमांकावर आहे.
पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमिथ रेड्डी यांना सहा स्थानांचा मोठा फटका बसला आहे. त्यांची जोडी ३३व्या स्थानी फेकली गेली आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी (२६), जक्कमपुडी मेघना- पूर्विशा राम (४२) यांना प्रत्येकी दोन स्थानांचे नुकसान सोसावे लागले आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी २८व्या स्थानासह भारताची सर्वोच्च स्थानावरील जोडी आहे.