पर्वरी येथील सायबर गुन्ह्यातील साडेनऊ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्यास पर्वरी पोलिसांना यश मिळाले आहे. निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पर्वरी येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरून दि. 5 रोजी पर्वरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
पर्वरी येथे संशयित आरोपीने अर्धवेळ नोकरीसह त्याला गुगल रेटिंग देण्याचे आमिष दिले होते आणि प्रत्येक रेटिंगला 40 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करून सुरुवातीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि तक्रारदाराला 9 लाख 50 हजार 149 रुपये देण्यास प्रवृत्त केले होते. तक्रारदाराने सदर रक्कम जीपे, एटीएम ट्रान्स्फर आदी व्यवहारातून भरली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी अनेक बँक खाती आणि फोन नंबरचे विश्लेषण केले असता असे आढळून आले की या गुन्ह्यात अनेक लोक सहभागी आहेत. तांत्रिक माध्यमाद्वारे शोध केला असता संशयित आरोपी मुंबईत असल्याचे आढळून आले आणि उपनिरीक्षक अरुण शिरोडकर, कॉन्स्टेबल आकाश नावेलकर, हेमंत गावकर आणि ऋषिकेश शेटगावकर यांचा समावेश असलेले पोलीस पथक दि. 28 रोजी तात्काळ मुंबईला गेले आणि संशयित आरोपी जगदीश अशोक बोकोलिया (26, चेंबूर, मुंबई) याला अटक केली.
उत्तर गोवा अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.