साट्रे-सत्तरीत वाघ-वाघीण कॅमेराबद्ध

0
165

म्हादई अभयारण्यात वारंवार पट्टेवारी वाघांचा संचार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. वन खात्याने लावलेल्या कॅमेर्‍यात साट्रे, सत्तरी येथे पुन्हा वाघीण व वाघ जंगलात फिरत असताना कॅमेर्‍यात टिपले गेले आहेत.

एप्रिल २०१३मध्ये वन खात्याने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघीणीची छायाचित्रे कॅमेराबध्द झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी डॉ. उल्हास कारंथ या आंतरराष्ट्रीय खातीच्या वाघतज्ञाने वाघाची छायाचित्रे कॅमेराबद्ध केली होती. पावसाळ्यानंतर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश सालेलकर यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत पट्टेरी वाघांच्या अस्तित्वाचा पुरावा शोधण्यासाठी सातत्याने शोध घेत कॅमेरा ट्रॅप लावले होते. गेल्या आठवड्यात हे कॅमेरे तपासले असता दोन ठिकाणी साट्रे गावातील जंगल परिसरात वाघीणीची छायाचित्रे कॅमेर्‍यात टिपली गेली. म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघांचा वावर असल्याचा सुगावा लागल्याने कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला व गेल्या आठवड्यात वाघीणीचे छायाचित्र कॅमेर्‍यात टिपले गेले. तिने पिल्लांना जन्म दिला असावा अशी शक्यता वन अधिकारी प्रकाश सालेलकर यांनी व्यक्त केली. आमचे अधिकारी याबाबत सखोल तपास व मागोवा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात अजित गावकर हे सुर्ला गावी जाताना त्यांना पट्टेरी वाघ दिसला होता. मुख्य रस्ता ओलांडून वाघ जाताना त्यांना वाघाचे दर्शन घडले होते. कोपर्डे परिसरातही तेथील ग्रामस्थ उमेश सावंत यांना दोन वेळा वाघाचे दर्शन घडले होते. भीमगड अभयारण्यात बेळगाव वन विभागाने विविध ठिकाणी कॅमेरे लावले असून हबनहट्टी येथे वाघ कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. या पुराव्यांमुळे भीमगड व म्हादई अभयारण्यात वाघांच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे.