सागरी सुरक्षेचा प्रश्न

0
27

कोकण किनार्‍यावर हरिहरेश्वरला काल तीन एके ४७ रायफलींसह आढळलेली आणि खळबळ माजवणारी बोट ही दहशतवाद्यांशी संबंधित नसल्याचा निर्वाळा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तटरक्षक दलाच्या हवाल्याने विधानसभेत दिल्याने देशवासीयांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. ज्या संशयास्पद परिस्थितीत ही बोट हरिहरेश्वर किनार्‍यावर स्थानिक मच्छिमारांना आढळली त्यावरून कोणाच्याही मनामध्ये भीती उत्पन्न होणे अगदी स्वाभाविक होते. तीन एके ४७ रायफलींसह अशा प्रकारे बेवारस आढळलेल्या या बोटीचा वापर एखाद्या दहशतवादी हल्ल्यासाठी तर होणार नव्हता ना अशी शंका जनतेच्या मनात डोकावली तर त्यात तिची बिलकूल चूक नाही. २९ वर्षांपूर्वी १९९३ साली मुंबईमध्ये दाऊद इब्राहिमने भीषण बॉम्बस्फोटमालिका घडवून आणली, तेव्हा तोवर आपल्या देशाला अपरिचित असलेले आरडीएक्स त्याचा भाऊ अनिस इब्राहिमने कोकणच्या किनारी रायगड जिल्ह्यामध्येच उतरवून घेतले होते. अशाच प्रकारे उतरवलेल्या एके ४७ पैकी काही अभिनेता संजय दत्तने मिळविल्या होत्या. मुंबईवर २००८ साली जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हाही दहशतवादी शस्त्रास्त्रांसह सागरी मार्गानेच मुंबईत उतरले होते. त्यामुळे नुकताच होऊन गेलेला देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन, येऊ घातलेले गणेशोत्सव – दीपावलीसारखे सणासुदीचे दिवस या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे एखादी बेवारस बोट शस्त्रास्त्रांसह सापडताच शंकेची पाल कोणाच्याही मनात चुकचुकणारच. सुदैवाने या बोटीसंदर्भातील सर्व तपशीलवार माहिती वेळीच उपलब्ध झाली आणि अकारण भीतीचे वातावरण निर्माण होणे टळले.
फडणविसांनी दिलेल्या माहितीनुसार मस्कतहून युरोपच्या दिशेने चालणारी ही बोट खवळलेल्या समुद्रात गेल्या २६ जूनला फुटली. त्यावरील सर्व खलाशांना एका कोरियन युद्धनौकेने वाचवले आणि बोट ओमानमध्ये नोंदणीकृत असल्याने ओमानच्या ताब्यात दिले. पण समुद्र खवळलेला असल्याने बोट वाहून नेता आली नाही. त्यामुळे लाटांबरोबर भरकटत ती हरिहरेश्वरच्या किनार्‍याला लागली. या लेडी हान नामक बोटीची मालकीण हाना लॉडर्सगन ही ऑस्ट्रेलियन आहे आणि तिचा पती जेम्स हार्बर्ट हाच या बोटीचा कॅप्टन होता. बोटीवर आढळलेली शस्त्रास्त्रे नेपच्यून मरीटाईम सिक्युरिटी या कंपनीने पुरवलेली होती असेही स्पष्ट झाले आहे. ही जहाजे आंतरराष्ट्रीय समुद्रातून प्रवास करीत असल्याने समुद्री चाच्यांपासून रक्षणासाठी त्यांना अशा प्रकारची सुरक्षा पुरविली जाते. त्यामुळे त्याचाच भाग म्हणून बोटीवर ही शस्त्रास्त्रे असू शकतात, परंतु जेव्हा बोट बुडाली तेव्हा त्या घटनेची वा त्यावरील ह्या शस्त्रास्रांची माहिती भारतीय तटरक्षक दलाला पुरवण्यात आली होती का, मिळाली असेल तर त्यांनी ते किनारी राज्यांना कळवले होते का या प्रश्नाचे उत्तरही मिळायला हवे. शस्त्रास्रांसह अशी बोट थेट कोकण किनार्‍यावर भरकटत वाहून येईपर्यंत तटरक्षक दलाला त्याचा थांगपत्ताही लागू नये ही बाब काही आपल्या सागरी सुरक्षेबाबत वि श्‍वास निर्माण करणारी नाही. बोट जून अखेरीस बुडाली होती आणि हा ऑगस्टचा उत्तरार्ध आहे. त्यामुळे जवळजवळ दोन महिने ही बोट आंतरराष्ट्रीय समुद्रात शस्त्रास्त्रांसह बेवारस तरंगत होती असा याचा अर्थ होतो.
आपल्या देशामध्ये नाना बहाण्याने शस्त्रास्त्रे उतरवण्याचे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. बंगालमध्ये पुरुलियात विदेशी व्यक्तींकडून विमानातून शस्त्रास्त्रे टाकली गेली होती. पाकिस्तानकडून तर द्रोनद्वारे शस्त्रे काश्मिरी दहशतवाद्यांसाठी सीमावर्ती भागात उतरवण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा बेवारस आढळलेल्या बोटीतील शस्त्रास्त्रांसंदर्भात भुवया उंचावणारच. फडणवीस यांनी तत्परतेने सविस्तर खुलासा केल्याने मोठा गोंधळ टळला आहे. अन्यथा आपल्याकडच्या आगावू वृत्तवाहिन्यांनी नाना तर्‍हेचे जावईशोध लावून जनतेमध्ये किती दहशतीचे वातावरण पसरवले असते याची कल्पनाही करवत नाही.
झाल्या प्रकरणाची एटीएसमार्फत चौकशी चालली आहे. त्यामुळे जी कहाणी बोटीच्या मालकिणीने सांगितली आहे तिची सत्यासत्यता त्यातून उघड होईलच, परंतु या निमित्ताने आपल्या सागरी सुरक्षेचा प्रश्नही नक्कीच ऐरणीवर आला आहे. तटरक्षक दल, नौदल, सागरी पोलीस अशा आपल्या नाना यंत्रणा सागरी सुरक्षेसाठी तैनात असताना अशा प्रकारे एखादी शस्त्रास्त्रांसह असलेली बोट अगदी किनार्‍यावर वाहून येऊ शकते यामध्ये भविष्यातील संभाव्य धोकेही नक्कीच दडलेले आहेत. त्यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सागरी सुरक्षा बळकट केली गेली पाहिजे.