मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात परत एकदा यात्रा काढण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेस व भाजप यांच्यातील वादाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या रविवार दि. २९ रोजी साखळी मतदारसंघातून भूमिपुत्र यात्रेचे आयोजन करण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. या यात्रेला परवानगी देण्याची मागणी साखळी गट कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष मंगलदास नाईक यांनी साखळीच्या उपजिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
साखळी रवींद्र भवनपासून साखळी बसस्थानकापर्यंत आम्हाला भूमिपुत्र यात्रेचे आयोजन करायचे आहे. दुपारी ३ वाजल्यापासून ही यात्रा काढणार असून ती संध्याकाळी ६ वाजता संपेल असे पत्रात नमूद केले आहे. कॉंग्रेसचे १० हजार कार्यकर्ते ह्या यात्रेत सहभागी होणार आहेत. कोविडसाठीच्या एसओपीचे ह्या यात्रेदरम्यान पालन करण्यात येणार असल्याचे परवानगी पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आयोजित केलेली सद्बुद्धी यात्रा भाजप कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती. या पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेस पक्षाने भूमिपुत्र यात्रेचे आयोजन केले आहे.