साखळी पालिका प्रभाग फेररचना, आरक्षणाविरोधातील याचिका फेटाळल्या

0
12

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने साखळी नगरपालिकेच्या प्रभाग फेररचना आणि आरक्षणाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळून लावली. दरम्यान, उच्च न्यायालयाने फोंडा नगरपालिकेच्या प्रभाग फेररचना आणि आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मंगळवारी फेटाळून लावली होती.

साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ आणि प्रवीण ब्लेगन यांनी साखळी नगरपालिकेच्या प्रभाग फेररचना आणि आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. साखळी नगरपालिकेतील प्रभाग संख्या 13 वरून 12 आणि प्रभाग फेररचनेला त्यांनी आव्हान दिले होते. साखळी नगरपालिकेच्या आरक्षण आणि फेररचनेसंबंधी आलेल्या हरकतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण व फेररचनेमध्ये काही दुरुस्त्या केल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालयीन पुनरावलोकनाची व्याप्ती फारच कमी आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात
आले.

भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी
भाजपने या दोन्ही नगरपालिकांमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी कंबर कसली आहे. पालिका निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना भाजपने आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. भाजपने साखळी नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे सोपविली आहे. फोंड्यात भाजपचे नेते, कृषी मंत्री रवी नाईक यांनी नगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपने फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याकडे सोपवली आहे.

तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
फोंडा आणि साखळी या दोन नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. या दोन्ही नगरपालिकांसाठी येत्या 5 मे रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. या दोन्ही नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला असून, 18 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.