साखळी येथे कार्डीयेक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना विधानसभेत काल दिली.
चोडण ते रायबंदर येथील फेरीबोटीतून रुग्णवाहिका नेण्यास मान्यता दिली जात नसल्याने मये मतदारसंघातील रुग्णांना त्रास सहन करावे लागत आहे. रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास उशीर होत असल्याने अनेक रुग्ण वाटेतच दगावले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या सुमारे २० जणांना उपचार वेळीच न मिळाल्याने दगावले आहे, असे मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.
मये मतदारसंघातील आजारी रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेतून प्रथम डिचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात येते. त्यानंतर रुग्णाला म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्याची सूचना केली जाते. म्हापसा येथे हदयरूग्णांसाठी योग्य सुविधा नसल्याने बांबोळी येथील हॉस्पिटलमध्ये नेण्याची सूचना केली जाते. यामुळे पाच ते सहा तास रुग्णाला योग्य उपचार मिळणे कठीण बनते, असेही आमदार झांट्ये यांनी सांगितले. सरकारच्या स्टेमी कार्यक्रमाअर्तंगत डिचोली येथे सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. राज्यात आणखी ८ ठिकाणी स्टेमी कार्यक्रमाअर्तंगत केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. डिचोली तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी साखळी येथे कार्डीयेक रुग्णवाहिका उपलब्ध केली जाईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.