>> केंद्राकडून कारखान्याला मिळणार ५८ कोटींचे अर्थसाहाय्य; मुख्यमंत्र्यांची माहिती; ऊस उत्पादक शेतकर्यांशी संवाद
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेला राज्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे ५८ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मडगाव येथे दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी काल मडगाव येथे राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांची भेट घेऊन त्यांची गार्हाणी ऐकून घेतानाच केंद्र सरकारच्या सहकार्याने साखर कारखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद असल्याने राज्यातील ऊस उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आधारभूत किंमत तसेच ऊस पीक घेण्यासाठीचा खर्च देण्याचे आश्वासन दिले.
ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने नवीन अधिसूचना काढल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. संजीवनी साखर कारखाना नव्या स्वरुपात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून ५८ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे, तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊसासाठी प्रति टनामागे सरकारने जाहीर केलेला वाढीव दर दिला जाईल. गेल्या पाच वर्षांतील वाढीव दराप्रमाणे ३८०० रुपये याप्रमाणे मदत या शेतकर्यांना देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी याबाबत शेतकर्यांशी चर्चा झाली होती. हा समझोता शेतकर्यांना मान्य झाला होता. शेतकर्यांच्या हिताबाबत सरकार जागरुक आहे, असेही त्यांनी सांगितले.
किसान योजनेच्या राज्यातील
लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद
पीएम किसान योजनेच्या राज्यातील लाभार्थ्यांशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. नेत्रावळी येथील प्रतिभा वेळीप यांनी पंतप्रधानांशी वार्तालाप केला. यावेळी वेळीप यांनी भातशेती, फळभाज्या, ऊस उत्पादनाबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. काल दुपारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतीतील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर व शेतकरी उपस्थित होते.