सांस्कृतिक, युवा सृजन पुरस्कार प्रदान

0
209

समाजातील युवा वर्गाला योग्य दिशा दाखविण्यासाठी ज्येष्ठांचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर भरकटणार्‍या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन जागतिक कीर्तीचे न्यूरो सर्जन गोमंत विभूषण पुरस्कार विजेते डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी येथे काल केले.

कला व संस्कृती खात्याच्या गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार आणि उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामाणी बोलत होते. यावेळी कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. रामाणी यांच्या हस्ते संगीत, साहित्य, नाट्य, लोककला आदी क्षेत्रातील २० मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि १३ जणांना युवा सृजन पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक, नम्रता, सचोटी हे गुण आवश्यक आहेत. राज्यातील ज्येष्ठ पुरस्कार प्राप्त केलेल्यांनी व्यक्तींनी जीवनात काही तरी कमाविले आहे. त्यांनी आपल्या ज्ञान, कलेचा युवापिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वापर करावा. आजच्या काळात पुस्तकांचे महत्त्व अबाधित आहे. पुस्तकातून विविध प्रकारचे ज्ञान मिळते. जुन्या पुस्तकाबरोबर नवीन वैज्ञानिक माहिती देणार्‍या पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे, असेही डॉ. रामाणी यांनी सांगितले.

ज्येष्ठांनी नवीन पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे तसेच युवा पुरस्कार प्राप्त युवकांनी इतरांसमोर आदर्श निर्माण करणारे काम करावे, असे आवाहन कला व संस्कृती मंत्री गावडे यांनी केले. राज्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करण्याची गरज आहे. ग्रंथालये सक्षम करण्याकडे लक्ष दिले जात आहे. कलाकार हा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता कार्य करीत असतो. त्यामुळे कलाकाराचा योग्य सन्मान करणे आवश्यक आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.