सांत आंद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तियोतिनो पेरेरा यांचे काल म्हापसा येथील खासगी इस्पितळात निधन झाले. गोवा महाराष्ट्रात विलिनीकरण करण्याऐवजी स्वतंत्र राहावा, यासाठी घेतलेल्या गोवा जनमत कौलात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
तियोतिनो पेरेरा हे गोव्याच्या पहिल्या विधानसभेचे आमदार होते. काही महिन्यांपूर्वी निधन पावलेले पहिल्या विधानसभेतील आमदार अच्युत उसगावकर आणि गजानन रायकर यांच्यानंतर सध्या हयात असलेले पेरेरा हे एकमेव आमदार होते.तियोतिनो पेरेरा हे युनायटेड गोवन्स पक्षाच्या उमेदवारीवर १९६३, १९६७ आणि १९७२ साली आमदार म्हणून निवडून आले होते.
१९७४ मध्ये युगो पक्षात फूट पडली आणि १९७७ च्या निवडणुकीपूर्वी बाबू नायक व डॉ. जॅक सिक्वेरा असे दोन गट सभागृहात झाले. त्यात सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली तिघा जणांचा गट वेगळा राहिला होता, त्यात पेरेरा यांचा समावेश होता. १९८० ची निवडणूक ते सांत आंद्रे मतदारसंघातून अर्स कॉंग्रेसतर्फे लढले आणि विजयी झाले. हा त्यांचा शेवटचा विजय होता. ते चार वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.