सांताक्रुज – फोंडा येथे भाच्याचा मामाकडून खून

0
5

मामाने भाच्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सांताक्रुज – फोंडा येथे काल सोमवारी दुपारी उघडकीस आली. रविवारी मध्यरात्री दारूच्या नशेत दोघांचे भांडण झाले. यात आपला भाचा अविनाश नाईक याच्या डोक्यावर दगड घालून मामा कृष्णा नाईक (67) याने त्याचा खून केला. फोंडा पोलिसांनी या खूनप्रकरणी कृष्णा नाईक याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपासणी करण्यात आली. निरीक्षक तुषार नाईक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मामा व भाचा यांच्यात घराच्या दुरुस्तीवरून भांडण सुरू झाले. दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत राहत होते. दोघेही दारूच्या नशेत असताना रविवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नाईक याने अविनाश नाईक याच्या खोलीत जाऊन त्याच्या डोक्यावर दगड तसेच अन्य साहित्याने वार करून खून केला. परंतु त्यानंतर दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या मामा व मामीने अविनाश नाईक याची चौकशी केली नाही.

सोमवारी दुपारी अविनाश याच्या मामीने त्याच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता अविनाश जमिनीवर मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर कृष्णा नाईक याने त्वरित अविनाशच्या विवाहित बहिणीला फोनद्वारे ही माहिती दिली. तसेच फोंडा पोलिसांना माहिती देण्यात आली. निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. रात्री उशिरा दक्षिण गोव्याच्या अधीक्षक सुनिता सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली.

अविवाहित असलेला अविनाश हा सेल्समन म्हणून फोंडा परिसरात काम करत होता. कृष्णा याला दारूचे व्यसन होते. पावसाळा जवळ आल्याने घराचे छप्पर दुरुस्त करण्यासाठी त्यांच्यात वाद सुरू होते. रविवारी रात्रीसुद्धा दारूच्या नशेत दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर मामाने भाच्यावर हल्ला चढवून खून केल्याचे निष्पन्न झाले.