सांकवाळ येथे आतेभावाकडून मामेभावाचा खून

0
13

>> संशयितास वेर्णा पोलिसांकडून अटक; खुनाची कबुली

कुठ्ठाळी-सांकवाळ पंचायत क्षेत्रातील एका भंगारअड्‌ड्यात काल एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह झरीत-सांकवाळ येथे राहत असलेल्या संजयकुमार यादव याचा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सदर खून अनैतिक संबंधांच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून, संशयित कन्हैयालाल यादव (३५) याने मामेभाऊ संजयकुमार यादव याच्या डोक्यावर धारदार वस्तूने आघात करून त्याचा खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह भंगारअड्‌ड्यात आणून टाकला. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी कन्हैयालाल यादव याला अटक केली आहे.

सध्या झरीत-सांकवाळ झरी येथे राहणारा आणि मूळ उत्तर प्रदेश येथील संजयकुमार यादव याचा सोमवारी मध्यरात्री कन्हैयालाल यादव (३२, रा. उत्तर प्रदेश) याने खून केला. त्यानंतर मंगळवारी पहाटे ४ वाजता संजयकुमारचा मृतदेह सांकवाळ मेटास्ट्रीप कंपनीसमोर असलेल्या कॉंक्रिटचे भंगार टाकणार्‍या जागेत आणून टाकला. काल सकाळी सकाळी ९.३० वाजता येथे भंगार टाकण्यासाठी आलेल्या काहींना या ठिकाणी मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेचच वेर्णा पोलिसांना माहिती दिली. वेर्णाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासिएस हे आपल्या इतर सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी चौकशीवेळी पोलिसांना हा मृतदेह संजय यादवचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी संजयच्या पत्नीला घटनास्थळी बोलवून तिला मृतदेह दाखविला. तिने तो ओळखला, असे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले. संजयबरोबर रात्री आतेभाऊ कन्हैयालाल हा होता, अशी माहिती संजयच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. तपासादरम्यान कन्हैयालाल हा ट्रक घेऊन सावर्डे येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथे एक पोलीस पथक गेले. त्यावेळी कन्हैयालाल ट्रकमध्ये माल भरत होता. पोलिसांनी त्याला घटनास्थळी आणले आणि चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. सोमवारी रात्री झुआरीनगर येथे कन्हैयालाल हा ट्रक घेऊन आला होता, तेथे त्याचा व संजयचा वाद झाला. त्यानंतर कन्हैयालालने ट्रकमध्येच त्याचा खून केला. पोलिसांनी मृतदेह मडगाव हॉस्पिसियोत पाठवला आहे.