सांकवाळमध्ये विजयादुर्गेची मूर्ती स्थापनप्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा

0
13

सांकवाळ येथील संरक्षित स्थळावर विजयादुर्गा देवीची स्थापना केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेथे स्थापन करण्यात आलेली विजयादुर्गा देवीची मूर्ती वेर्णा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत तेथील छोटे बांधकाम हटविले आहे.

संरक्षित स्थळावर विजयादुर्गा देवीची स्थापना केल्याने तेथील एका चर्चचे फादर व काही स्थानिकांनी शुक्रवारी सायंकाळी संबंधितांना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचे फादर व इतरांनी सांगितले होते. तथापि, उपअधीक्षक सलीम शेख, उपअधीक्षक नीलेश राणे यांनी त्यांची समजूत काढून तणावावर नियंत्रण ठेवले.

या संरक्षित स्थळावरून यापूर्वीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन दिवसांपूर्वी सदर संरक्षित स्थळावर पहाटे काही व्यक्तींनी तेथे लहान घुमटीसदृश बांधकाम उभारून विजयादुर्गा देवीची स्थापना करून पूजा केली. यासंबंधी दखल घेताना पुरातत्व खात्याचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपअक्षीक्षक सलीम शेख, वेर्णा पोलीस व इतर संबंधितांनी तेथे येऊन परिस्थितीची पाहणी केली. पुरातत्व खात्याकडून यासंबंधी अहवाल मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाणार आहे. तथापि, फादर व इतर ख्रिश्चन बांधवांनी शुक्रवारी ज्यांनी मूर्तीची स्थापना केली, त्यांना अटक करण्याची मागणी केली. तथापि, आम्हाला त्वरित अटक करता येणार नाही. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यावर त्यांना समन्स पाठविण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, सलीम शेख व नीलेश राणे यांनी तेथे जमा झालेल्या लोकांची समजूत काढली. त्यामुळे तेथील तणाव निवळला.