सहा महिन्यांत अधिकाधिक कुळ-मुंडकार खटले निकाली

0
22

>> महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून स्पष्ट

कुळ-मुंडकार कायद्याखालील तब्बल १६ हजार खटले प्रलंबित असून, यासंबंधीची प्रक्रिया गतिमान करून येत्या सहा महिन्यांच्या आत जास्तीत जास्त खटले निकाली काढले जाणार असल्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल स्पष्ट केले. मोन्सेरात यांनी सोमवारी पर्वरी येथील मंत्रालयात आपल्या खात्याचा ताबा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कुळ-मुंडकार कायद्याखालील हजारो खटले गेल्या कित्येक वर्षांपासून निवाड्याच्या प्रतीक्षेत असून, या खटल्यांना वेग देऊन ते लवकरात लवकर हातावेगळे करता यावेत, यासाठी महसूल खात्यात आवश्यक ते बदल घडवून आणण्याची गरज आहे, असेही मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.
‘तारीख पे तारीख’ देणे यासारखे प्रकार थांबायला हवेत आणि त्यासाठी मामलेदार व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. महसूल खात्याकडील कुळ-मुंडकार खटले निकाली काढण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असून, गरज भासल्यास लोकांनी त्यासंबंधीच्या अडचणी घेऊन थेट आपल्याकडे यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, बाबूश मोन्सेरात यांच्याकडे महसूल या महत्त्वाच्या खात्याबरोबरच कामगार व रोजगार, तसेच कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत.

सुदिन ढवळीकरांनी घेतला
कार्यालयाचा ताबा

मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पर्वरी येथील मंत्रालयात आपल्या कार्यालयाचा ताबा काल घेतला. मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणार्‍या खात्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारात सुदिन ढवळीकर यांच्यासह नीळकंठ हर्ळणकर आणि सुभाष फळदेसाई यांची वर्णी लागली आहे; मात्र नवीन तिघांही मंत्र्यांना अजून खाती दिलेली नाहीत.

ढवळीकरांना वीज खाते मिळणार
मंत्री सुदिन ढवळीकर यांना वीज खाते देण्याचे निश्‍चित झाले असल्याची माहिती काल भाजपमधील सूत्रांनी दिली. वीज खात्यासाठी ढवळीकर व सुभाष फळदेसाई यांच्यात स्पर्धा होती; मात्र केंद्रातील काही नेत्यांनी ढवळीकर यांचे नाव पुढे केल्याने त्यांना वीज खाते देण्याचा निर्णय झाला असल्याचे काल सूत्रांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, नव्या तीन मंत्र्यांना मंगळवारी खातेवाटप होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.