दुचाकीस्वारालाच हेल्मेट सक्ती : देसाई
राज्यातील महामार्गांवरून दुचाकीस्वराच्या मागे बसून प्रवास करणार्यांना हेल्मेटची सक्ती करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला होता तो मागे घेण्यात आलेला असून हेल्मेटची सक्ती ही फक्त दुचाकी चालवणार्यांसाठीच असेल असे वाहतूक खात्याचे संचालक अरुण यांनी काल सांगितले. जे दुचाकीचालक हेल्मेट न घालता महामार्गांवरून प्रवास करतील त्यांच्या दुचाक्या ताब्यात घेण्यात येतील व हेल्मेट आणल्यानंतरच दुचाक्या घेऊन त्यांना पुढच्या प्रवासावर जाता येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.मंगळवारपासून महामार्गांवर हेल्मेटची सक्ती करण्यात येईल असे देसाई म्हणाले. पण मजेची गोष्ट म्हणजे यापूर्वीही महामार्गांवर हेल्मेटची सक्ती होती व हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्यांना दंड ठोठावण्यात येत असे. त्यामुळे हेल्मेटबाबत सरकारने नवे असे काहीच केले नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सरकारने दुचाकीच्या मागे बसून प्रवास करणार्या व्यक्तींना (महामार्गांवरून) हेल्मेटची सक्ती केली जाईल असे जाहीर केले होते. पण त्याबाबत आता सरकारने घुमजाव केले आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागलेल्या असून त्यामागचे नेमके कारण काय ते स्पष्ट करण्याची मागणी होऊ लागली आहे. रस्त्यांवरील अपघातासंबंधी चिंता व्यक्त करणार्या व या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी काम करणार्या ‘मार्ग’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीच्या मागे बसून प्रवास करणार्या व्यक्तींनाही हेल्मेटची सक्ती केली जावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्या व्यक्तीला केवळ १०० रु. एवढा दंड देण्याची तरतूद केंद्रीय मोटर वाहन कायद्यात असल्याचे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी सांगितले.
चार दिवसात ३०० जणांना दंड
पणजी (प्रतिनिधी) ः गेल्या चार दिवसात हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणार्या ३०० जणांना दंड करण्यात आला असून दंड भरल्यानंतरही हेल्मेट नसताना वाहन घेऊन जाण्यास देणार नसल्याचे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी सांगितले.
दंडाची रक्कम अल्प असल्याने हेल्मेट वापरण्याऐवजी दंड भरणे पसंत करतात. त्यामुळे हेल्मेट नसताना वाहन चालविणार्यास बंदी घालण्याचे ठरविले आहे. त्यामुळे दुचाकी स्वारांना आता हेल्मेट घालावेच लागेल. कोणत्याही परिस्थितीत दुचाकी चालविणार्यांनी हेल्मेटचा वापर करावा म्हणून वाहतूक खात्याचे प्रयत्न आहे.