गोवा राज्य सहकारी बँकेच्या येत्या २५ ऑगस्ट २०१९ रोजी होणार्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील मातब्बरांचे अर्ज फेटाळण्यात आल्याने सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बँकेच्या निवडणूक नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आल्याने सहकार क्षेत्रातील मातब्बरांना फटका बसला आहे.
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप, बँकेचे माजी अध्यक्ष रामचंद्र मुळे, राजकुमार देसाई, दादी नाईक यांच्यासह अनेकांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत. या चार जणांनी घेतलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत उमेदवारी अर्ज रद्दबातल प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय काल जाहीर केला.
माजी सहकारमंत्री वेळीप यांनी सांगितले की, बँकेच्या संचालक मंडळाच्य निवडणुकीसाठी तयार नवीन उपविधी नियमाची अंमलबजावणी नियमानुसार सप्टेंबर २०२२ नंतर करायला हवी होती. परंतु, या उपविधीची अंमलबजावणी लवकर करण्यात आल्याने त्याचा अनेकांना फटका बसला आहे. गोव्यातील सहकार क्षेत्रात आघाडीवरील केपे येथील आदर्श कृषी सहकारी संस्थेच्या प्रतिनिधीचा उमेदवारी अर्ज नवीन उपविधीमुळे ग्राह्य होत नाही हा दुर्दैवी प्रकार आहे, असे मत वेळीप यांनी व्यक्त केले. महिला आणि एसटी समाजातील उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. सहकार खात्याने सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या ठिकाणी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होणार्यासाठी उपविधीच्या नावाखाली जाचक अटी घालण्यात आलेल्या आहेत. ९७ च्या घटना दुरुस्तीचा भंग केला जात आहे, असे माजी मंत्री वेळीप यांनी सांगितले.
बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी प्रक्रियेबाबत बँकेचे माजी अध्यक्ष राजकुमार देसाई यांनी संशय व्यक्त केला.