सलोखा टिकवूया

0
10

गोव्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या विषयावरून रण पेटले आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे जुन्या गोव्याच्या चर्चमध्ये असलेले शव त्यांचेच आहे की नाही ह्याची खातरजमा करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करा असे प्रक्षोभक विधान करून गोव्याचे माजी संघचालक श्री. सुभाष वेलिंगकर यांनी वादाचे मोहोळ स्वतःवर ओढवून घेतले. वेलिंगकर यांचे विधान हे त्यांचे नसून त्यांनी डिचोलीच्या सभेत केवळ अवतरण उद्धृत केले होते, असे वेलिंगकर समर्थक म्हणत आहेत. श्रीलंकेहून काही वर्षांपूर्वी आलेल्या एका व्यक्तीने ही मागणी तेव्हा पत्रकार परिषदेतून केली होती, ह्याचा उल्लेख वेलिंगकर यांनी आपल्या त्या भाषणात केलेला होता हे खरे, परंतु सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याप्रती श्रद्धा असलेल्या लाखो ख्रिस्ती बांधवांच्या भावना त्यातून दुखावल्या जातील आणि त्यातून गोव्याच्या सामाजिक संतोषाला तडा जाऊ शकतो ह्याचे भान वेलिंगकर यांनी बोलताना जरूर ठेवायला हवे होते. सेंट फ्रान्सिस झेवियर हे भारतात आलेले पहिले जेजुईट धर्मप्रचारक होते. त्यांच्याबाबत अनेक मतेमतांतरे आहेत. इतिहासकारांनी ती सबळ पुराव्यांनिशी नोंदवून ठेवलेली आहेत, परंतु आजच्या अत्यंत स्फोटक सामाजिक परिस्थितीमध्ये अशी काही ऐतिहासिक माहिती मांडणे हेदेखील जिकिरीचे ठरू लागले आहे, कारण विचारांना विचाराने उत्तर देणाऱ्या आणि ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ वर श्रद्धा ठेवणाऱ्या विचारवंतांची आज समाजात कमी आहे आणि केवळ झुंडशाहीवर विवास ठेवणाऱ्या टग्यांची चलती आहे. अशा गोष्टींमध्ये मतांचे राजकारण शिरले आहे ते तर वेगळेच. शिवाय ह्या जुन्या गोष्टी उकरून काढून समाजामध्ये आग भडकावणे सयुक्तिक ठरणार नाही, कारण त्यातून चांगले काही निष्पन्न होण्याची सुतराम शक्यताही दिसत नाही. सेंट फ्रान्सिस झेवियरशी निगडीत अनेक कथित चमत्कारांमुळे आणि त्यांना व्हॅटिकनने संतपद बहाल केलेले असल्याने त्यांच्याप्रती श्रद्धा असलेले लाखो लोक जगभरात आहेत. आपल्या कौटुंबिक दुःखावर आणि समस्यांवर उतारा मिळावा म्हणून केवळ ख्रिस्तीच नव्हे, तर असंख्य हिंदू देखील ‘गोंयचो सायब’ म्हणून त्यांच्या चरणाशी दरवर्षी तीन डिसेंबरला भाविकतेने धाव घेत असतात. त्यांच्या नावाची महाविद्यालये, संस्था, इस्पितळे जगभरात आहेत. पूर्वेतिहास काहीही असला तरी आज ते एक जागतिक श्रद्धास्थान बनलेले आहे. त्यामुळे त्यांच्याप्रतीच्या सर्वसामान्यांच्या त्या प्रामाणिक भावनांना तडा जाऊ नये ह्याची काळजी घेणे भाग आहे. शिवाय भावना दुखावणे हे अलीकडे फार सोपे झाले आहे. त्यामुळे अशा संवेदनशील विषयावर काहीतरी बेफाम बोलून, वागून, लिहून अकारण धार्मिक तणाव निर्माण करणे सयुक्तिक नाही आणि कोणाच्या भल्याचेही नाही. आज देशभरात धर्माच्या व जातीच्या नावावर दंगेधोपे चालतात, परंतु गोव्याने आपली सहिष्णुता आणि सौहार्द आजवर टिकवून ठेवलेले आहे. आपल्यासाठी आजवर हा अभिमानाचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे भलत्या वादाने त्याला सुरूंग लागणार नाही हे पाहणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी ठरते, कारण ह्या धार्मिक सामंजस्याला तडा गेला, तर त्याचे दाहक परिणाम शेवटी गोव्यातील सर्वसामान्यांनाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे फादर बॉलमॅक्स काय किंवा वेलिंगकर काय, सर्वांनी हे भान ठेवावे आणि स्वतःची राजकीय ईप्सिते साध्य करण्यासाठी गोव्याच्या जनतेला भरीस घालू नये. हवेच असेल तर न्यायालयात जाऊन सनदशीर मार्गाने लढावे. सेंट फ्रान्सिस झेवियरचा शवदर्शन सोहळा गोवा मुक्तीपासून आजवर नेमाने चालत आलेला असताना वेलिंगकर यांना यावर्षीच त्याविरोधात एवढी आक्रमक भूमिका घ्यावीशी का वाटली आणि त्यांच्या त्या एका वक्तव्यावर गावोगावी जमावाला रस्त्यावर उतरवून शक्तिप्रदर्शन घडवणारे पडद्यामागील सूत्रधार कोण आहेत हेही ह्यानिमित्ताने शांतचित्ताने तपासण्याची आवश्यकता आहे. सरकार तर पूर्वीप्रमाणे आताही सेंट फ्रान्सिस झेवियरच्या शवदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी रुपये खर्चून ख्रिस्ती मतांची बेगमी करण्याच्या धडपडीत आहे. ह्या वादाने तेही मागे हटेल असे वाटत नाही. मग ह्या वादाची फलनिष्पत्ती काय? राज्यापुढे सध्या रस्त्यांपासून रोजीरोटीपर्यंतचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना भिडण्याऐवजी इतिहासातील गोष्टी उकरून काढून धार्मिक तणाव निर्माण करण्याने गोव्याचे आणि गोव्याच्या जनतेचे काय भले होणार आहे? त्यामुळे सध्याच्या वादाचे निमित्त करून ख्रिस्ती विरुद्ध हिंदू अशी येथे उभी फूट पाडून आणि ह्या दोन्ही समाजघटकांना एकमेकांसमोर उभे करून गोव्याची आजवरची ओळख असलेली शांतता, सलोखा आणि सौहार्द ह्याचा बळी दिला जाऊ नये हीच ह्या घटकेस प्रत्येक शांतताप्रेमी गोमंतकीयाची इच्छा आहे.