काल गुरुवार दि. २ रोजीपासून पाच दिवस संलग्न सुटी मिळाल्याने राज्यात देशी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली असून मिरामार, बागा, कळंगुट, कोलवा, बाणावली आदी समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. त्याचप्रमाणे गोव्यातूनही अनेक कुटुंबे सहलीसाठी गोव्याबाहेर गेली आहेत.
काल पणजी शहरातील पदपथांवर पर्यटकांची बरीच गर्दी होती. कॅसिनो खेळण्यासाठी मंगळवारीच अनेक पर्यटक गोव्यात आले होते. कॅसिनो जेटीबाहेर त्यांची गर्दी होती. परंतु २ रोजी या गांधी जयंतीदिनी सरकारने जारी केलेल्या आदेशाद्वारे कॅसिनो बंद ठेवल्याने त्यांना कॅसिनोत प्रवेश करता आला नाही. कॅसिनोवर प्रवेश करण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटकांची गर्दी पाहून राज्यातील हॉटेल मालकांनीही पर्यटकांकडून मनमानी हॉटेलभाडे आकारण्यास सुरुवात केल्याने काही गरीब पर्यटकांची गैरसोय झाल्याचे एका पर्यटक गाईडचे म्हणणे होते.