>> राज्यात नवे २६६८ कोरोनाबाधित; ३१४५ जण कोरोनामुक्त
राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली असून, बळींच्या संख्येतील वाढ मात्र कायम आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन २६६८ कोरोनाबाधित आढळून आले, तर आणखी ९ कोरोना बळींची नोंद झाली. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३७.४२ टक्के एवढे आहे.
गेल्या चोवीस तासांत नवीन ७१२९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील २२६८ नमुने बाधित आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २२ हजारांच्या खाली असून, सध्या २१ हजार ९७४ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना बळींची एकूण संख्या ३५९४ एवढी झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित बळींच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात ९ कोरोनाबाधितांचा बळी गेला आहे. राज्यात इस्पितळात दाखल होणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत ४६ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्या झालेल्या १४ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले.
बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक
गेल्या चोवीस तासांत नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३१४५ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६४ टक्के एवढे आहे.
लस घ्या; मुख्यमंत्र्यांचे पुन्हा आवाहन
राज्यात कोविड लस न घेतलेल्या कोरोनाबाधितांचा बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड लस घेण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कोविड-१९ या महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.