नॉर्थ ईस्ट युनायटेडवर ३ गोलांनी मात
यजमान एफसी गोवाने हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकताना स्वमैदानावरील अखेरच्या मुकाबल्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडवर ३-० असा देखणा विजय प्राप्त केला. ब्राझिलचे महान फुटबॉलपटू झिको यांच्या मार्गदर्शनाखालील यजमान संघाने स्वमैदानावरील सलग तिसर्या विजयासह आयएसएल गुणतक्त्यात द्वितीय क्रमावर झेप घेतली. याआधीच्या सामन्यात एफसीने गोवाने एफसी पुणेवर २-० आणि केरला ब्लास्टर्सवर ३-० असे विजय मिळविले होते.येथील नेहरू स्टेडियमवर स्वशौकिनांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यात रंगलेल्या या उत्कंठावर्धक मुकाबल्यात, विजेता एफसी गोवा संघ मध्यंतराला २-० असा आघाडीवर होता. ‘हीरो ऑफ दी मॅच’ रोमिओ फर्नांडिस (३३वे मिनिट), मिरोस्लाव स्लेपिका (४५+ मिनिट) आणि आंद्रे सांतोस (७४वे मिनिट) यांनी विजेत्यातर्फे गोल नोंदवले.
स्वमैदानावरील अखेरच्या लीग सामन्यातील विजयासह एफसी गोवाने १२ सामन्यातील १८ गुणांसह दुसर्या क्रमावर झेपा घेत उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली. एफसी गोवाचे सेकंड लेगमधील शेष दोन सामने चेन्नईन एफसी (दि. ५) आणि ऍटलेटिको दे कोलकाता (दि. १०) यांच्याविरुध्द होतील. नॉर्थ ईस्ट युनायटेड संघ १२ सामन्यातील १३ गुणांसह सहाव्या क्रमावर राहिला. उभयतांमधील फर्स्ट लेग लढत १-१ अशी गोलबरोबरीत सुटली होती.
यजमानांनी प्रारंभापासून आक्रमक खेळीत प्रतिस्पर्ध्यांवर चढाया केल्या पण हरून आमिरी आणि आंद्रे सांतोसचे हेडरवरील प्रयत्न हुकले. ३३व्या मिनिटाला स्थानिक स्टार रोमिओ फर्नांडिसने एफसी गोवाचे खाते खोलले. देवव्रत रॉयने उजव्या फळीतून मुसंडी मारीत स्लेपिकाला पास दिला. त्याने तो रोमिओकडे वळविल्यावर, युवा विंगरने प्रतिस्पर्धी गोलरक्षक रेहनेसला चकवीत यजमानांचा पहिला तथा आयएसएलमधील शंभरावा गोल नोंदवला (१-०). नॉर्थ ईस्ट युनायटेडला ४०व्या मिनिटाला दुर्मिळ संधी लाभली, पण कोकेच्या क्रॉसनंतर दुर्गा बोराचा फटका बचावपटू ब्रुनो पिन्होरोवर आदळून ‘कॉर्नर’ला गेला.
मध्यंतराच्या ‘इंज्युरी टाइम’मध्ये झेक स्ट्रायकर स्लेपिकाने एफसी गोवाचा दुसरा गोल नोंदवला. जॅन सेडाने केलेल्या ‘थ्रो’नंतर रोमिओने जोरदार मुसंडी मारीत प्रतिस्पर्धी बचावपटूला चकवीत गोलतोंडावर पास दिला आणि ‘डिफ्लेक्शन’नंतर मिळालेला चेंडू स्लेपिकाने अचूक जाळीत फटकावीत यजमानांची आघाडी २-० अशी भक्कम बनविली.
उत्तरार्धात नॉर्थ ईस्टचा संधी मिळाली पण स्पॅनिश स्ट्रायकर कोकेचा फटका एफसी गोवाचा गोलरक्षक जॅन सेडाने डावीकडे झेपावत रोखला. दोन मिनिटानंतर रोमिओला आपला स्पर्धेतील तिसरा गोल नोंदण्याची संधी होती, पण स्लेपिकाच्या पासनंतर मिगेल गार्सियाने त्याचा प्रयत्न थोपविला. ६६व्या मिनिटाला रोमिओला आणखी एक संधी मिळाली पण त्याचा फटका प्रतिस्पर्धी खेळाडू सॅम्बौववर आदळून बाहेर गेला.
७४व्या मिनिटाला ब्राझिलियन प्लेमेकर आंद्रे सांतोसने यजमानांचा तिसरा गोल केला. मंदार रावच्या चालीनंतर नारायण दासने चेंडू गोलतोंडावर सांतोसकडे दिला आणि त्याने जवळपास तीन बचावपटू असताना शांतपणे ‘राइटफूटर’ जाळीत फटकावला (३-०).
७७व्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट युनायटेडला संधी मिळाली. जोसलच्या फ्रीकिनंतर गार्सियाने हेडरद्वारे चेंडू कीनेकडे वळविला. पण त्याने फटका बाहेर तटविला. अंतिम क्षणात राखीव क्लिफर्ड मिरांडाच्या पासवर स्लेपिकाला गोल संधी मिळाली होती, पण त्याचा फायदा घेता आला नाही.
एफसी गोवा : जॅन सेडा, देवव्रत रॉय, ग्रेगरी अर्नोलिन, बू्रनो पिन्हेरो, नारायण दास, विक्रमजीत सिंग, हरून आमिरी, रोमिओ फर्नांडिस (जोवेल राजा), आंद्रे सांतोस, मंदार राव देसाई (क्लिफर्ड मिरांडा), स्लेपिका (बेनेग्लौन).
नॉर्थ ईस्ट युनायटेड : रेहनेश, खोंगजी, मास्सांबा, गार्सिया, फीलिप, एम्तोंगा (जेम्स कीने), राल्ते (ऍलन डेराय), चान्सा (तोमास), बोयतोंग, दुर्गा बोरो आणि कोके.
इंडियन सुपर लीग गुणतक्ता
क्रम संघ सामने गोलफरक गुण
१. चेन्नईन एफसी १२ ६ २२ २. एफसी गोवा १२ ७ १८
३. ऍथलेटिको दे कोलकाता ११ ४ १७
४. केरला ब्लास्टर्स एफसी १२ -३ १५
५. दिल्ली डायनामोज एफसी ११ १ १३
६. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी १२ -२ १३
७. एफसी पुणे सिटी ११ -५ १३
८. मुंबई सिटी एफसी ११ -८ १२