राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच असून सलग चौथ्या दिवशी शंभरपेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासांत राज्यात नवीन 119 बाधित आढळून आले असून एका बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 15.6 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्या 680 झाली आहे.
चोवीस तासांत आणखी 762 स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. चोवीस तासांत 40 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 6 बाधितांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात मागील चार दिवसांपासून शंभरपेक्षा जास्त नवीन कोरोना बाधित आढळून येत आहेत. गेल्या मार्च 2023 या महिन्यात एका कोरोना बळीची नोंद झाली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सक्रिय रूग्णसंख्या 10 एवढी होती. आता, सक्रिय रूग्णसंख्या सातशेच्या जवळ येऊन ठेपली आहे. एप्रिल महिन्यात नवीन बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. एप्रिल महिन्यात पहिल्या दोन दिवसांत 236 बाधित आढळून आले असून 9 जणांना इस्पितळात दाखल करावे लागले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे.