सर्व सरकारी खात्यांतील रिक्त पदांची माहिती द्या

0
4

>> गोवा कर्मचारी भरती आयोगाकडून परिपत्रक जारी

सरकारी खात्यातील अनुकंपा, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या कोट्यातील जागा वगळून अन्य रिक्त जागांची माहिती सर्व सरकारी खात्यांनी गोवा कर्मचारी भरती आयोगाला द्यावी, असे निर्देश आयोगाने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

आयोगाच्या भरती नियम 4 (2) नुसार खातेप्रमुखांनी 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या काळात फॉर्म 1 व फॉर्म 2 च्या स्वरूपात रिक्त जागांची माहिती ऑनलाइन स्वरूपात द्यावी. संकेतस्थळावर फॉर्म 1 व फॉर्म 2 ऑनलाइन स्वरूपात पाठविण्यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, यापूर्वी कळवलेल्या रिक्त पदांची माहिती 2025 मध्ये पुन्हा कळवण्याची गरज नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.

गोवा कर्मचारी भरती आयोगाने एलडीसी व ज्युनियर स्टेनोग्राफर 285 पदांच्या भरतीसाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम जारी करण्यात आला आहे.

एलडीसी व ज्युनिअर स्टेनोग्राफर पदासाठी प्रत्येकी 60 गुणांचे सीबीटी-2 व सीबीटी-3 असे दोन पेपर असतील. प्रत्येकी पेपरसाठी 75 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. एलडीसी पदासाठी संगणकाच्या ज्ञानासह इंग्रजीमधून टायपिंगची 30 शब्द प्रती मिनिट अशी गती आवश्यक आहे. तसेच ज्युनिअर स्टेनोग्राफर पदासाठी शॉर्ट हँडची गती प्रती मिनिट 100 शब्द व टायपिंगसाठी 35 शब्द प्रती मिनिट अशी गती असणे आवश्यक आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.