किनार्यांवर दारू पिणार्यांना लाख रु. पर्यंत दंड, आणखी ३०० जीवरक्षकांची भरती
सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील सर्व किनार्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला असून येऊ घातलेला पर्यटन मोसमात हे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय किनार्यांवरील सर्व शॅक्समध्येही कॅमेरे बसवणे सक्तीचे करण्यात आलेले आहे.
देश-विदेशातून येणार्या पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने सुरक्षेच्या बाबतीत तडजोड न करण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला आहे.
किनार्यांवर उघड्यावर बसून मद्यप्राशन करण्यावर पर्यटन खात्याने यापूर्वीच बंदी आणलेली असून या बंदीचे उल्लंघन करून उघड्यावर दारू प्राशन करणार्यांना ५ हजारांपासून एक लाख रु. पर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
गोवा पर्यटन संरक्षण व व्यवस्थापन कायदा २००१ खाली किनार्यावर उघड्यावर बसून मद्यप्राशन करणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. किनारपट्टीवर येणारे पर्यटक व विशेष करून महिला पर्यटक, अन्य पर्यटक तसेच स्थानिक यांना या दारुड्यांपासून उपद्रव होत असल्याचे आढळून आल्याने पर्यटन खात्याने वरील कायदा केलेला आहे.
किनार्यांवर कचरा टाकण्यावर बंदी असून कुणीही कचरा टाकत असल्याचे अथवा कचरा जाळत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सुरक्षेसाठी आयआरबी
पर्यटन मोसम तसेच बिगर पर्यटन मोसमातही राज्यातील किनारपट्टीवर सुरक्षेची जबाबदारी इंडियन रिझर्व्ह बटालियन सांभाळत आहेत. त्यासाठी गोवाभरातील किनार्यांवर इंडियन रिझर्व्ह बटालियनचे १५० जवान यापूर्वीच तैनात करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय समुद्रातील पाण्यात उतरणारे पर्यटक बुडून ठार होऊ नयेत यासाठी पर्यटन खात्याने किनार्यांवर ५५० जीवरक्षक तैनात केलेले असून लवकरच आणखी ३०० जीवरक्षक घेण्यात येणार आहेत. जीवरक्षकांची नेमणूक करण्याचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे.