सर्व व्यवसाय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत आज निर्णय शक्य

0
14

>> तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार सरकार निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यातील ५० टक्के क्षमतेने सुरू असलेले सर्व व्यवसाय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत गुरुवार दि. ३ मार्च रोजी निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्यातील कोविड तज्ज्ञ समितीने सर्व व्यवसाय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर सरकार निर्णय घेऊ शकते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.

राज्यातील नवीन कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. सिनेमागृह, कॅसिनो आदी ५० टक्के क्षमतेने सुरू असलेले आता व्यवसाय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची गरज आहे. कोविड तज्ज्ञ समितीने याबाबत शिफारस केली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी कोविड कृती दलाची बैठक घेण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक व्यवसायावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी घट झाल्यानंतर व्यवसाय ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. तिसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत बरीच घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यालयांचे पहिली ते बारावी, तसेच महाविद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी राज्यातील कोविड तज्ज्ञ समितीच्या बैठकीत कोरोनाच्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट तसेच इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्यात ५० टक्के क्षमतेने सुरू असलेले सर्व व्यवसाय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची शिफारस करण्यात आली होती.