यंदाच्या इफ्फीत गोव्यातील प्रत्येक तालुक्यात चित्रपट दाखवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ईएसजीने चित्रपट महोत्सव संचालनालयाकडे केली असल्याची माहिती ईएसजीतील सूत्रांनी काल दिली.यापूर्वी एकदा अशा प्रकारे राज्यातील विविध तालुक्यांत चित्रपट दाखवण्यात आले होते. तर एका वर्षी समुद्रकिनार्यांवरही चित्रपट दाखवण्यात आले होते. पण नंतर तशा प्रकारे चित्रपट प्रदर्शन बंद करण्यात आले होते.
दरम्यान, यंदा इफ्फीत कोकणी व मराठी चित्रपटांसाठी जो स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आलेला आहे त्या विभागासाठी २४ चित्रपट ईएसजीकडे आलेले असून त्यात ८ पूर्ण लांबीचे चित्रपट व १६ लघुपटांचा समावेश आहे. या चित्रपटांच्या छाननीचे व निवडीचे काम सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, चित्रपट व लघुपटांसाठी ईएसजीने सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र सक्तीचे केल्याने चित्रपट निर्मात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, इफ्फी अवघ्या २३ दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अधिकारी इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात गोव्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन सोसायटीतील सूत्रांनी काल दिली.