>> मुख्यमंत्र्यांची विधानसभा अधिवेशनात माहिती
गोव्याचे थोर स्वातंत्र्यसेनानी दीपाजी राणे यांचे स्मारक व किल्ला तसेच हिरवे गुरूजी यांच्या स्मारकासह राज्यातील सर्व ऐतिहासिक स्मारके व स्थळे यांचे गोवा मुक्तीच्या या हिरक महोत्सवी वर्षी नुतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा विधानसभेत दिली. काल प्रश्नोत्तराच्या तासाला फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी फोंडा येथील क्रांती मैदानाच्या नुतनीकरणासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
फोंडा येथील क्रांती मैदानाचे सुशोभीकरण तसेच नुतनीकरण करताना भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप रवी नाईक यांनी फोंडा क्रांती मैदानाच्या सुशोभीकरणासंबंधीच्या प्रश्नातून केला होता. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले. या मैदानाचे नुतनीकरण करण्याच्या कामावर ४ कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी खर्च झालेला असला तरी या कामात कोणताही भ्रष्टाचर झाला नसल्याचे पाऊसकर यांनी म्हटले.
या कामासाठीच्या कंत्राटदाराची व सल्लागाराची नेमणूक करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप रवी नाईक यांनी केला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तसेच जीएसआयडीच्या यादीत नसलेल्या कंत्राटदाराची व सल्लागाराची या कामासाठी निवड करण्यात आल्याचा व घाईघाईत केवळ एकाच दिवसात सर्व संबंधितांकडून फाईल मंजूर करून घेऊन हे काम करण्यात आल्याचे नाईक म्हणाले. एवढ्या तातडीने हे काम हाती घेण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी केला.
यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, अभिजीत साधले हे या प्रकल्पाचे सल्लागार होते व ते जीएसआयडीच्या यादीत (एमपॅनल) आहेत.
यावेळी रवी नाईक यांनी पाऊसकर यांना उलट सुलट प्रश्न विचारून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाऊसकर यांनी तुम्हाला नक्की काय हवे आहे, असे त्यांना विचारले असता या कामाची चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचे नाईक म्हणाले.
क्रांती मैदान जेथे आहे त्या जागेवर खरे म्हणजे कोणतीही क्रांती झाली नव्हती. खरी क्रांती ही लोहिया मैदानावर झाली होती असेही यावेळी रवी नाईक म्हणाले.
दिगंबर कामत यांनी यावेळी लोहिया मैदानाच्या सुशोभीकरणाची मागणी केली असता यंदाचे वर्ष हे गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष आहे. त्यामुळे यंदा राज्यभरातील सर्व ऐतिहासिक स्थळे व स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके यांचे सुशोभीकरण करण्याचे काम सरकार हाती घेणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.