सर्वांसमक्ष वाघाने युवकाला केले भक्ष्य!

0
83

दिल्लीत अभयारण्यातील थरारक घटना
वाघाने एका विशीतील युवकाला भक्ष्य करण्याची अंगावर शहारे आणणारी घटना दिल्लीत अभयारण्यात सर्वांसमक्ष घडली.
काहींच्या म्हणण्यानुसार हा युवक फोटो काढण्यासाठी वाघाभोवतीच्या कुंपणावर चढल्यावेळी अपघाताने घसरून या सहा फूट लांबीच्या पांढर्‍या वाघासमोर पडला. तो नेमका कसा पडला याबाबत नक्की समजू शकले नाही. पण काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीप्रमाणे तो तोल जाऊन घसरून पडला. अभयारण्याचे क्युरेटर खान यांच्यानुसार या युवकाने स्वत:हून आत उडी घेतली. या युवकाचे नाव मक्सूद असून तो दिल्लीती असल्याचे कळते.
ही घटना काल दुपारी १२.३० ते १च्या दरम्यान घडली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार आपल्या अधिवासात मनुष्य आल्याचे पाहून वाघच आधी आश्‍चर्यचकित झाला. वाघाने सुरूवातीला युवकाला काहीच केले नाही. जवळजवळ १५ मिनीटे या युवकाला पाहत बसला होता. मात्र अवतीभवतीच्या लोकांनी भीतीने कांगावा सुरू केला. शिवाय रक्षकांनीही कुंपणावर धडक द्यायला सुरुवात केली. त्यातच काही उपस्थितांनी वाघावर दगड मारायला सुरुवात केली. याप्रकाराने वाघ बराच आक्रमक बनला. त्यानंतर त्याने युवकाला मानेला धरून फरफटत नेले व ठार केले.
हा सर्व प्रकार तिथे उपस्थितांसमोर घडत असताना कोणी काहीच करू शकत नव्हते. विशेष म्हणजे अभयारण्याच्या रक्षकांकडे वाघाला मूर्च्छित करण्यासाठी गोळी झाडणार्‍या बंदुकाही नव्हत्या. काहींनी हा थरार आपल्या मोबाइलवर टीपला, ज्यात वाघ युवकाला मानेला धरून फरफटत नेताना व त्याचा अंत करताना दिसते आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर कितीतरी तास वाघाच्या परिसरातून युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलीस व अभयारण्य अधिकार्‍यांना यश आले नव्हते. नंतर वाघाला पिजर्‍यात बंद करण्यात आले.