सर्वांच्या ‘ताई’ गेल्या…

0
18
  • – डॉ. सोमनाथ कोमरपंत

मुंबईत आणि गोव्यात कितीतरी अभावग्रस्त, होतकरू आणि अन्य कारणांमुळे शिक्षण अर्ध्यावर राहिलेल्या माणसांनी प्राचार्य वाघसरांच्या मार्गदर्शनामुळे, मदतीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे यश पाहणे हा ताईंच्या जीवनातील आनंद! ताई गेल्यामुळे दुःखाची छाया सर्वत्र पसरली..

मडगावच्या श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य द. भ. वाघ हे गोव्याच्या शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाचे नाव. गणिताचे ते नामवंत प्राध्यापक. कुशल प्रशासक. व्यासंगप्रिय आणि सद्भिरुचिसंपन्न व्यक्तिमत्त्व. गणिताबरोबर व विज्ञानक्षेत्राबरोबरच त्यांना मानव्य विद्याशाखांविषयी तेवढेच ममत्व वाटत होते. आस्था होती. नवमुक्त गोमंतकातील शैक्षणिक समस्यांचे त्यांचे आकलन प्रगल्भ होते. प्रारंभीच्या काळात त्यांनी मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये आणि पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये गणिताचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजसारख्या नामवंत कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या या अनुभवसंपन्नतेचा लाभ चौगुले एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘श्रीमती पार्वतीबाई चौगुले कॉलेज’ला मिळाला. आपल्या द्रष्टेपणाने आणि उपक्रमशीलतेने त्यांनी या शिक्षणसंस्थेची दृढ कोनशिला बसवली. १९६२ ते १९६९ ची पहिली टर्म या कालावधीत त्यांचे शैक्षणिक नेतृत्व या कॉलेजला लाभले. १९६९ च्या दुसर्‍या टर्मपासून १९७७ पर्यंत प्राचार्य द. भ. वाघ यांनी मुंबई विद्यापीठाच्या पणजी येथील पदव्युत्तर केंद्राचे संचालक म्हणून यशस्वीपणे धुरा वाहिली. त्यांच्या या कारकिर्दीत ज्ञानशाखांचा विस्तार झाला. अनुभवसंपन्न आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले प्राध्यापक या केंद्राला लाभले. प्राचार्य द. भ. वाघ यांच्या शैक्षणिक कार्याला, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वसंचाराला सर्वतोपरी बळ देणार्‍या आणि ज्ञानयज्ञामध्ये समर्पित भावनेने समरस झालेल्या त्यांच्या सहधर्मचारिणी श्रीमती हिरा वाघ यांचे मंगळवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ च्या सुमारास वार्धक्याने मुंबईत- त्यांच्या राहत्या घरी- निधन झाले. त्यांनी ९८ वर्षे पूर्ण केली होती. ९९ व्या वर्षी त्या गेल्या. आणखी तीन महिन्यांनी त्या ९९ वर्षे पूर्ण करणार होत्या. त्यांच्या निधनप्रसंगी सुप्रसिद्ध वास्तुविशारद असलेल्या त्यांच्या कन्या श्रीमती वीणा विर्जिनकर आणि नातू ओजस हे होते. सर्वतोपरी ती त्यांची काळजी घेत असत. त्यांच्या परिवारातीलच नव्हे तर शिक्षणक्षेत्रातील ज्या-ज्या व्यक्तींचा त्यांच्याशी संपर्क आला होता, जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते, त्यांच्या काळजाचा ठोका चुुकला. सर्वजण त्यांना ‘ताई’ या नावाने संबोधत होते. ताई गेल्यामुळे दुःखाची छाया सर्वत्र पसरली.

त्याला कारणही तसेच होते. सरांच्या कार्याशी त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या की त्यांच्या सहजीवनात सहसा न आढळणारे अद्वैत होते. सरांच्या शैक्षणिक कार्याचा साक्षिभाव त्यांनी तन्मयतेने जागविला होता. त्यांच्या आरोग्याची दक्षता त्या घेत होत्या. त्यांच्या जीवनस्वप्नांकडे त्यांनी जागरुकतेने लक्ष पुरविले; पण त्या केवळ सावली बनून राहिल्या नाहीत. त्यांनी स्वतःचे असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण केले होते. आदर्श गृहिणीचे दायित्व सांभाळून त्यांनी कुशल चित्रकर्ती म्हणून नावलौकिक प्राप्त केला. विशेषतः ‘पोटर्‌रेट पेंटिंग’मध्ये त्यांनी प्रावीण्य संपादन केले होते. त्यांना त्यात अनेक पारितोषिके मिळाली होती. त्यांनी आपली मुलगी वीणा विर्जिनकर यांचेही उत्कृष्ट पोर्टे्रट तयार केले होते. आपला व्यासंग वाढविला होता. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञाची पत्नी म्हणून वावरत असताना सर्व शैक्षणिक संदर्भांची अद्ययावतता त्यांनी ठेवली होती. वय झाले, शरीर थकले, पण आपली जीवनेच्छा त्यांनी मावळू दिली नाही. आघात तर अनेक झाले. कर्तासवरता धाकटा मुलगा चि. सुमंत्र अकाली गेला. निवृत्तीनंतरही गणिताच्या अभ्यासक्षेत्राशी प्राचार्य वाघ निगडित होते. त्या अभ्यासाला पूरक अशा ‘बॉम्बे मॅथेमॅटिकल कॉलोक्विअम्’ या गणिताला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या संपादनात त्यांचा मौलिक सहभाग असे. शारीरिक स्वास्थ्य नसतानाही ते ‘रुपारेल कॉलेज’मध्ये या नियतकालिकासाठी होणार्‍या बैठकांना उपस्थित राहायचे. त्यांचे कार्यदर्शी नेतृत्व संबंधितांना प्रेरक वाटायचे. अशा वेळी ताई सतत डोळ्यांत तेल घालून सरांच्या निरामयतेसाठी जपायच्या, झटायच्या. ‘चौगुले कॉलेज’ व पदव्युत्तर केंद्रातील प्राध्यापकवर्गाशी आणि अन्य स्टाफशी ताईंनी घरगुती स्वरूपाचे अनुबंध राखले होते. त्यांची स्मरणशक्ती तल्लख. सर्वांविषयीची त्यांनी मायाममता, आस्था आणि स्नेहशीलता जोपासली. प्राचार्य वाघसरांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करण्यापूर्वी या जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे ताई शरीराने आणि मनाने खचल्या. पण सरांनी शैक्षणिक कार्य करताना प्रत्येकाविषयी विश्‍वास अन् आदर बाळगला. भिन्न-भिन्न मतप्रणालीच्या मंडळींना शिक्षणाविषयीची निष्ठा आणि कार्यतत्परता यांच्या अंतःसूत्राने बांधण्याची त्यांची कार्यशैली यांच्या आठवणी त्यांनी जपल्या. ‘गोव्याच्या शिक्षणक्षेत्रातील माझी १५ वर्षे’ हे सरांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक मुद्रित स्वरूपात येण्याचे राहून गेले होते. ते मूर्त स्वरूपात यावे म्हणून त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. त्यांना पुत्रवत असलेले जामात स्वतंत्र्यसेनानी आणि नंतर उद्योजक म्हणून ओळखले जाणारे मोहन विर्जिनकर यांच्याही मृत्यूचे दुःख त्यांना सहन करावे लागले. पण मुला-नातवंडांत त्या कालक्रमणा करू लागल्या. गोव्याला आल्यावर त्या पूर्वपरिचितांना भेटण्याची संधी दवडत नसत. १९६५ सालापासून प्राचार्य वाघसरांनी मला सहानुभूतीने आणि ममत्वाने वागविले. ते तर माझ्या आयुष्याचे मार्गदर्शक ठरले. तोच कनवाळूपणा ताईंनी सातत्याने बाळगला. सर दिवंगत झाल्यानंतरही पुत्रवत जिव्हाळा त्यांनी माझ्याविषयी बाळगला. त्याबद्दल कृतज्ञतेचा एक कोपरा मी त्यांच्यासाठी राखून ठेवला आहे.

संस्कारबहुल आणि कलासक्त व्यक्तिमत्त्व
ताईंचा सुरुवातीपासूनचा जीवनपट मला पुरेशा प्रमाणात ज्ञात नाही. थोडीफार माहिती आहे. सुसंस्कारी वातावरणात त्या वाढल्या आणि पुढेही उच्चविद्याविभूषित आणि उच्च अभिरुची बाळगणार्‍या संस्कारसंपन्न घरात समृद्ध सहजीवनाचा पट त्यांनी निर्माण केला. कलाभिरूची आवडीने जोपासली. वाघदांपत्य हा आदर्श सहजीवनाचा वस्तुपाठ आहे. गोव्यात होणार्‍या साहित्याच्या उत्सवांत, साहित्यसंमेलनांत, कविसंमेलनांत त्या दोघांनी आवर्जून उपस्थिती लावलेली आहे. आयुष्यात महनीय कर्तृत्व दर्शविलेल्या व्यक्तींबद्दल त्यांना केवढा आदरभाव! केवढे ममत्व! गुरुवर्य डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये यांच्या १९८५ साली झालेल्या अमृतमहोत्सवप्रसंगी त्यांनी केलेले प्रयत्न- सायास मी जवळून अनुभवले आहेत. तीच आस्था, तेच प्रेम त्यांनी एकेकाळी सहकारी असलेले नामांकित कोकणी कवी आणि साहित्यिक डॉ. मनोहरराय सरदेसाय यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीप्रसंगी प्रा. वाघसरांनी दाखविले. ‘संस्कृत प्रचारिणी सभे’त डॉ. श्री. शं. फडकेसर आणि प्रा. विठ्ठलदास नागवेकरसर यांच्या मदतीने उत्स्फूर्तपणे छोटासा सोहळा त्यांनी घडवून आणला. आदरणीय ताई आणि त्यांचा परिवार तेथे उपस्थित होता. तीच गोष्ट ‘गोमंत विद्यानिकेतन’च्या ग्रंथालय सभागृहात डॉ. ग्रामोपाध्येसरांच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या स्नेहभेटीची. असे कैक प्रसंग सांगता येतील. दुसर्‍यांच्या आनंदात आपला आनंद मानणारे हे दांपत्य!

ताईंचे बालपण व शिक्षण मुंबईत झाले. त्यांचे माहेर असोळण्याच्या प्रभु-चोडणकर कुटुंबातले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण ‘रामनारायण रुईया कॉलेज’मध्ये सुरू झाले. प्रा. श्री. पु. भागवत हे त्यांचे मराठीचे प्राध्यापक होते असे ताईंनी मला सांगितल्याचे आठवते. पुढे कौटुंबिक जबाबदारी आली. लीला शेरे ही त्यांची जिवलग मैत्रीण. कुटुंबाचा भार सांभाळीत मैत्रिणीच्या साहाय्याने ताईंनी बी. ए. ऑनर्स पूर्ण केले. लीला शेरे भारी प्रेमळ… मुलांची ती लीलामावशी…
पदवी परीक्षेनंतर ताई आपल्या आवडीच्या चित्रकलाक्षेत्राकडे वळल्या. श्री. जोशीसरांनी त्यांना या क्षेत्रात मौलिक मार्गदर्शन केले. पोटर्‌रेट पेंटिंगमध्ये अधिक रूची असल्यामुळे त्यांनी तेथे लक्ष केंद्रित केले. नामांकित चित्रकार एम. आर. आचरेकर यांच्या शिष्या होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आयुष्यात चित्रकलेची पाठ त्यांनी कधी सोडली नाही. अगदी अलीकडच्या काळात पॅलेट-कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर चित्रे काढण्याचा छंद त्यांनी जोपासला… परिणतप्रज्ञ वयातही चित्रकलेचा हा त्यांचा केवढा मोठा ध्यास?
प्राचार्य वाघसरांचे निवासस्थान म्हणजे शिक्षणक्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तींचे निवासस्थान. ताईंच्या साक्षीने मुंबईत आणि गोव्यात कितीतरी अभावग्रस्त, होतकरू आणि अन्य कारणांमुळे शिक्षण अर्ध्यावर राहिलेल्या माणसांनी प्राचार्य वाघसरांच्या मार्गदर्शनामुळे, मदतीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे यश पाहणे हा ताईंच्या जीवनातील आनंद! दुसरी नोंदवण्यासारखी बाब म्हणजे मुंबई विद्यापीठातली वरिष्ठ मंडळी प्राचार्य वाघसरांकडे यायची. वैचारिक क्षेत्रातील आणि वाङ्‌मयक्षेत्रातील प्रा. अ. भि. शहा, डॉ. व. दि. फडके, प्रा. ग. प्र. प्रधान, त्यांची पत्नी डॉ. मालविकाबाई अशा दिग्गज मंडळींच्या सहवासात काव्य-शास्त्र-विनोदाची आनंदमय मैफल चालायची. हसतमुखाने ताई या सर्वांचे स्वागत करायच्या… मैफलीत भाग घ्यायच्याशिवाय या अन्नपूर्णेच्या हातांमुळे अभ्यागत संतुष्ट मनाने परतायचे.
आता फक्त आठवणी… सर्वांच्या ‘ताई’ गेल्या… अंतःकरणाला चटका लावून गेला… त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच प्रार्थना!