सर्वसामान्यांच्या वीजभाराच्या तपासणीपूर्वी 1460 कोटींची थकबाकी वसूल करा : काँग्रेस

0
4

वीज विभागाच्या व्यावसायिक, औद्योगिक आणि सरकारी कार्यालयांकडे सुमारे 1460 कोटींची थकबाकी आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सामान्य लोकांच्या वीजभाराची तपासणी करण्यापूर्वी या थकबाकीदारांकडील प्रलंबित रक्कम वसूल करण्यासाठी प्रथम पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेस माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे थकबाकीदार व्यावसायिक आणि धनाढ्य वीज ग्राहकांना संरक्षण देत आहेत. व्यापारी ग्राहक श्रेणी अंतर्गत सुमारे 14,000 वीज बिल थकबाकीदार, 635 औद्योगिक श्रेणी अंतर्गत वीज बिल थकबाकीदार, 2669 सरकारी कार्यालये, महामंडळे, अनुदानित संस्था इत्यादी अंतर्गत वीज बिल थकबाकीदार आहेत आणि अन्य सुमारे 3480 थकबाकीदार आहेत ज्यांचे एक लाख पेक्षा जास्त वीज बिल थकित आहे. या वरील सर्व श्रेणीतील थकबाकीदारांची एकूण थकित रक्कम 1460.81 कोटी आहे आणि ती 2018-19 पासून प्रलंबित आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी जुलै 2023 मध्ये गोवा विधानसभेत दिलेल्या उत्तरांचा दाखला देऊन केला.

राज्यातील विविध भागात पावसाळ्यात रस्ते पूर्ववत करण्याकडे विद्युत विभागाच्या पूर्ण दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सोनल मालवणकर, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सई वळवईकर यांची उपस्थिती होती.