पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शांतताप्रीय गोव्यात समाज विघातक शक्तींनी काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून येथील वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही केले तरी त्याचा कदापिही येथील समाजावर परिणाम होणार नसल्याचा संदेश देण्यासाठी रविवार दि. १६ रोजी संध्याकाळी ५ वा. मडगाव येथील लोहिया मैदानावर संगीतमय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती प्रसिद्ध पॉप गायिका हेमा सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
येथील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणार्यांमध्ये आपल्याच समाजातील काही विघातक शक्ती कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने बाहेरून येणारे काही विघ्नसंतोषी लोक बेफाम वक्तवे करून निघून जातात. अशा शक्तींसमोर गोमंतकीय जनतेने बळी पडू नये, असे आवाहन सरदेसाई यांनी केले. वरील गैर प्रकारांचा गोमंतकीयांवर काहीही परिणाम होऊ शकत नाही. सर्व धर्माचे लोक सर्वधर्मसमभावाचा धागा कायम राखतील. हा संदेश वरील कार्यक्रमातून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांनाही वरील समाजविरोधी शक्ती अपशकून करण्याचा प्रयत्न करतात, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास पर्यटन उद्योग क्षेत्रातील लोकांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. गोमंतकीय कलाकार गोव्याबाहेर असले तरी त्यांचे गोव्यावर लक्ष असते. त्यामुळेच या कार्यक्रमात अन्वर शेख, एडवीन फर्नांडिस, अँथनी ब्रागांझा आदी अनेक कलाकार सहभागी होतील अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.
दि. १६ रोजी संध्याकाळी ५ वा. मडगाव येथील पालिका चौकातून शांतता मिरवणूक निघेल. नंतर लोहिया मैदानावर मिरवणुकीचे जाहीर सभेत रूपांतर होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेस सिनेमाफोटोग्राफर शिरीष देसाई, कलाकार अमन शेख, सावियो कुएल्हो, शॅक मालक संघटनेचे डिन डिक्रूज आदी उपस्थित होते.