कॉस्मोस एरेनावर खेळविण्यात आलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ई’ गटातील पहिल्या सामन्यात सर्बियाने कोस्टा रिकावर १-० अशी निसटती मात करीत शानदार विजयी सलामी दिली. या गटात सर्बिया व कोस्टा रिका यांच्या सह ब्राझील आणि स्वित्झर्लंड या अन्य दोन बलाढ्य संघांचा समावेश आहे.
दोन्ही संघ पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीत राहिले होते. या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर भर देत काही संधीही निर्माण केल्या होत्या. परंतु त्यांना गोल नोंदविण्यात अपयश आले होते. या सत्रात सर्बियाच्या आलेक्झांडरला हेडरद्वारे संधी हुकली होती. तर कोस्टा रिकाच्या गियानकार्लो गोन्झालेजने हेडरवर दोनदा चेंडूला जाळीची दिशा दाखविण्याची संधी गमावली.
उत्तरार्धात ५६व्या मिनिटाला सर्बियाने एक धोकादायक चाल रचली आणि त्यावेळी कोस्टा रिकाकडून डी कक्षेबाहेर महत्त्वाची चूक घडली. त्यांचा बचावपटू गुझमनने सबिर्यन खेळाडू मित्रोविचला अवैधरित्या रोखण्याचा प्रयत्न केला आणि रेफ्रीने सर्बियाला २५ मीटर अंतरारवर फ्री-कीक बहाल केली. त्यावर कर्णधार अलेक्झांडर कोलारोव्हने कोणतीही चूक न करता उजव्या पायाच्या घेतलेल्या फटक्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवित चेंडू थेट जाळीत पाठवित सर्बियाच्या १-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केला.