
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा एकतर्फी सामन्यात ६-२, ६-२ ७-६ (३) असा पराभव करत आपले चौथे विंबल्डन ग्रँडस्लॅम विजेेतेपद पटकावले. सेंटर कोर्टवर झालेल्या या अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सर्व्हिस गमवावी लागल्यानंतर अँडरसनने सावरण्यासाठी खूप वेळ घेतला. याचाच फायदा उठवत जोकोविचने दोन तास १३ मिनिटे चाललेला सामना जिंकला. जोकोविचचे हे तेरावे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. जवळपास वर्षभरापूर्वी ईस्टबोर्न स्पर्धा जिंकल्यानंतर टूरवरील त्याचे हे पहिलेच जेतेपद ठरले. विंबल्डनपूर्वी जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानी असलेल्या जोकोविचने या कामगिरीसह ‘टॉप १०’मधील आपले स्थान निश्चित केले आहे. अँडरसनला उपांत्यपूर्व व उपांत्यफेरीत अनुक्रमे रॉजर फेडरर व जॉन इस्नर यांच्यावर विजय मिळविण्यासाठी एकूण दहा तास ५० मिनिटे कोर्टवर घालवावी लागली होती. तर दुसरीकडे जोकोविचचोवीस तासांच्या हात दुसरा सामना खेळत होता. पहिल्या दोन सेटमध्ये टुकार खेळ केल्यानंतर अँडरसनला तिसर्या सेटमध्ये सूर गवसला. परंतु, या सेटमध्ये जोकोविचने मोक्याच्या क्षणी अँडरसनला रोखत सामना चौथ्या सेटपर्यंत लांबणार नाही याची दक्षता घेतली.
ब्रायन-सॉक जोडी अजिंक्य
अमेरिकच्या माईक ब्रायनने पुरुष दुहेरीतील आपले सतरावे ग्रँडस्लॅम विजेतेपद शनिवारी रात्री पटकावले. आपला देशवासी जॅक सॉकसह खेळताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या रेवन क्लासेन व न्यूझीलंडच्या मायकल व्हीनस जोडीचा ६-३, ६-७ (७-९), ६-३, ५-७, ७-५ असा पराभव केला. ४० वर्षे व ७६ दिवस वय असलेला माईक ‘ओपन इरा’मध्ये विंबल्डन जिंकणारा सर्वांत वयस्क खेळाडू ठरला. माईकने २००६, २०११ व २०१३ साली आपला बंधू बॉबसह विंबल्डन विजेतेपद पटकावले होते. परंतु, कमरेच्या दुखापतीमुळे बॉब खेळू न शकल्याने माईकने जॅक सॉकसह आपली जोडी बनवली होती. दुसरीकडे १९८३ साली ख्रिस लुईस पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत खेळल्यानंतर स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा व्हीनस हा न्यूझीलंडचा पहिलाच खेळाडू ठरला होता. २००५ साली वेस्ली मुडीने स्टीफन हास याच्यासह विंबल्डन जेतेपद मिळविल्यानंतर क्लासेन अशी कामगिरी करणारा आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू बनण्याच्या मार्गावर होता.
दुसरीकडे महिला दुहेरीचे विजेतेपद बार्बरा क्रेसिकोवा व कॅतरिना सिनियाकोवा यांंनी पटकावले. विंबल्डन मुलींच्या दुहेरीचे व महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविणारी ही पहिलीच जोडी ठरली. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात त्यांनी निकोल मेलिचार व क्वेटा पेशके यांना ६-४,४-६, ६-० असे पराभूत केले.