‘सर्जिकल स्ट्राइक’चा व्हिडिओ तब्बल २१ महिन्यांनंतर जारी

0
112

भारतीय लष्कराने सीमेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ ‘टाइम्स नाऊ’ या चॅनलच्या हाती लागला असून सदर चित्रफीत भारतीय लष्कराच्या क्षमतेविषयी शंका घेणार्‍यांना सडेतोड प्रत्युत्तर मानले जात आहे. विशेष म्हणजे तब्बल २१ महिन्यांनंतर सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ उपलब्ध झाला आहे.

मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अरुण शौरी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका करताना केंद्र सरकारने केलेली सर्जिकल स्ट्राइक ही ‘फर्जिकल स्ट्राइक’ असल्याची टीका केली होती. भारतीय जवान शौर्य गाजवताना केंद्र सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याने त्यांनी खिल्ली उडवली होती. या पार्श्‍वभूमीवर या व्हिडिओला महत्त्व प्राप्त झाले आहे.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी अतिशय गुप्तपणे भारतीय लष्कराने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी सीमापार जाऊन अनेक पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले होते. भारतीय सैन्याने सीमापार घुसून केलेल्या या धडक कारवाईची जगभर चर्चा झाली होती. या कारवाईनंतर पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक घडलाच नसल्याचा कांगावा केला होता. मात्र, टाइम्स नाऊने जारी केलेल्या व्हिडिओत लष्कराचे जवान चार टार्गेट्‌स टिपताना स्पष्ट दिसत आहेत. यामुळे शंका घेणार्‍यांची तोंडे बंद होणार आहेत.

जवानांकडे असलेल्या यूएव्ही आणि हेड माऊंटेड कॅमेर्‍यांमधून ही दृष्ये टिपण्यात आली आहेत. आतापर्यंत या सर्जिकल स्ट्राईकच्या सत्यतेबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. तसेच पाकिस्तानने अशी कोणतीच कारवाई झाली नसल्याचा कांगावाही केला होता.