सर्जनपर्व

0
79

डॉ. सोमनाथ कोमरपंत

१९ डिसेंबर २०११ रोजी गोमंतकाच्या मुक्तीची ५० वर्षे पूर्ण होतील. विश्वचक्राच्या गतीच्या संदर्भात ५० वर्षांचा काल खास उल्लेखनीय नसला, तरी गोमंतकीयांच्या दृष्टीने या अर्धशतकाच्या वाटचालीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. १९ डिसेंबर १९६१ रोजी दीर्घ काळाच्या पारतंत्र्यानंतर गोमंतक मुक्त झाला. आपल्या प्राणप्रिय भारतभूमीशी एकरूप झाला. भारतीय भूमीच्या स्वातंत्र्याला त्यामुळे पूर्णत्व आले. भारतीयांच्या असीम त्यागामुळे, देशभक्तांच्या बलिदानामुळे दीडशे वर्षे दृढमूल झालेली ब्रिटीश सत्ता नाहीशी झाली. फ्रेंच राजवटीने येथील वसाहतींमधून गाशा गुंडाळला, पण हेकट मनोवृत्तीच्या पोर्तुगीज सत्तेने येथील जनतेला आपल्या जोखडाखाली ठेवले. दमनप्रक्रियेने येथील जनतेची स्वातंत्र्याकांक्षा दडपून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चौदा वर्षे आम्हा गोमंतकीयांना परकीय राजवटीत दिवस कंठावे लागले, याची खंत आमच्या मनात होतीच. संग्रामपर्व सुरूच होते. अनेक स्वातंत्र्यसेनानींनी विविध मार्गांनी आणि समर्पणशील वृत्तीने हा लढा प्रदीर्घ काळ चालू ठेवला.

त्यांच्या या दृढ प्रयत्नांना शेवटी यश आले. वेळोवेळी सत्याग्रहाच्या मार्गाने जो लढा उभारला गेला, त्यावेळीही एकात्म भारताचे प्रातिनिधिक दर्शन घडले. भारताच्या विविध राज्यांतून सत्याग्रही आले. शेवटी भारतीय सेनेच्या पराक्रमामुळे गोमंतभूमी मुक्त झाली. गोमंतकीयांनी अत्युच्च आनंदाचा क्षण या महन्मंगल दिनी अनुभवला. युरोप खंडातील टीचभर देशाने खंडप्राय भारतातील या हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या पुण्यभूमीवर आपले आधिपत्य प्रस्थापित करावे याचा निरंतर सल सर्वांच्या अंतःकरणात होता. ही भूमी मुक्त झाली. ‘याचि देही, याचि डोळां’ हा आनंदक्षण अनुभवता आला. ते तरंग पन्नास वर्षांनंतर तसेच कायम आहेत. याहून दुसरी श्रेयस्कर घटना असू शकत नाही. ‘शतकांनंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट…’ या वसंत बापटांच्या कवितेतील अनुभूतीचा आस्वाद गोमंतकीयांनी घेतला.

मुक्तीनंतरच्या अर्धशतकात गोमंतकाचा मनू बदललेला आहे. आपण एका महान परंपरा असलेल्या देशाचे घटक आहोत. ‘आ सेतु हिमाचल’ विविधतेने विनटलेल्या ‘सुजलाम् सुफलाम्’ भूमीचे घटक आहोत. आशियातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राचे घटक आहोत.

भारतीयांचे सुखदुःख ते आमचे सुखदुःख अशी एकात्मतेची भावना आमच्या अंतःकरणात वसत आहे. गेल्या अर्धशतकात घडलेल्या आनंदक्षणी आणि आपत्तीच्या क्षणी आपण ती दाखवून दिलेली आहे. या कालावधीत आपण काय कमावले आणि काय गमावले याचा अंतर्मुख वृत्तीने मागोवा घ्यायचाही हा क्षण आहे.

आत्मनिर्भरशील वृत्तीने भवितव्य घडवू

आजमितीला लोकशाही शासनपद्धती गोमंतकीयांनी आत्मसात केलेली आहे. सामाजिक अभिसरणप्रक्रियेला गती आलेली आहे. शिक्षणाची दालने खुली झालेली आहेत. वाढत्या शिक्षणप्रसाराबरोबर औद्योगिकीकरणाला गतिमानता आलेली आहे. परकीय सत्तेने येथील माणसांची मने मारून टाकलेली होती. आज न्यूनगंडाची भावना नाहीशी होऊन आत्मनिर्भरशील वृत्तीने आपले भवितव्य घडवण्याची अभंग जिद्द आपल्याला लोकशाहीच्या मूलतत्त्वांनी दिलेली आहे. ही आपल्याला प्राप्त झालेली सनद आहे.

राजकीय स्वातंत्र्य माणसाला का आवश्यक आहे? ते आपल्याला काय देते? ते मानवी आत्म्यांना मुक्त करते. आत्मिक स्पंदनांना वाट करून देते. या आत्माभिव्यक्तीमुळे माणसांमाणसांमध्ये विचारांचा, भावनांचा आणि संवेदनांचा सेतू निर्माण होतो. राष्ट्रात नवी चेतना निर्माण होते. राष्ट्रनिर्माणाच्या नव्या ऊर्मी जन्म घेतात. आशा – आकांक्षा पल्लवीत होतात. चांगल्या विचारांचा उगम व्यक्तिमात्रापासून होतो आणि त्याचा संगम समष्टीत होतो. व्यक्ती ही अंतिमतः समष्टीच्या अभ्युदयासाठी आहे, असेच भारतीय विचारप्रणाली अधोरेखित करीत आलेली आहे. भारतीय वाङ्‌मयीन परंपरेचे परिशीलन करताना याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

राष्ट्रीय चैतन्याच्या रक्तवाहिन्या ः वृत्तपत्रे

वृत्तपत्रे आणि नियतकालिके या राष्ट्रीय चैतन्याच्या रक्तवाहिन्या आहेत. लोकशाहीचा हा महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. मर्मबिंदू आहे. जीवनव्यापी मूल्यांच्या पोषणासाठी जनसामान्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाणीची प्रक्रिया सुरू करण्याची प्रभावी क्षमता या माध्यमात आहे. अर्थात, हे माध्यम जबाबदारीने, संयमाने आणि वस्तुनिष्ठ सत्यशोधनाच्या प्रेरणेने हाताळले गेले पाहिजे. हे जितके परिणामकारकतेने वापरले जाईल, तितके लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब स्वच्छपणे त्यात उमटेल.

गोमंतकाच्या मुक्तीनंतरच्या कालखंडात येथील मराठी वृत्तपत्रांनी जे लक्षणीय कार्य केले, त्याचे संक्षिप्त विहंगमावलोकन करणे हे या लेखाचे सीमित उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय प्रवाहाशी सामरस्ययोग घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मुक्तीनंतरच्या वृत्तपत्रांनी केले. नव्या चैतन्याची लाट त्यामुळे निर्माण झाली. विचारस्वातंत्र्याचे नवे वारे येथे वाहू लागले. वृत्तपत्र हे लोकशिक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असते. लोकमान्य टिळक,डॉ. ना. भि. परुळेकर यांसारख्या अग्रगण्य संपादकांचा जनसामान्यांचा भाषेत अग्रलेख लिहिला जावा, याकडे कटाक्ष असे. या दृष्टीने गोमंतकीय वृत्तपत्रांनी महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे.

गोव्याच्या मुक्तीनंतर त्याच्या राजकीय भवितव्याचा प्रश्‍न हा ऐरणीवर प्रश्न ठरला. स्थानिक भाषांशी हा प्रश्‍न निगडीत असल्यामुळे अटीतटीने हा संघर्ष चालू राहिला, त्यासंबंधीचे अनुकूल आणि प्रतिकूल मतप्रकटन होत राहिले. वृत्तपत्रे हा लोकमानसाचा आरसा असल्यामुळे वाचकांचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात चालतो. लोकमानसातील आनंद, दुःख, वैताग, निराशा, विसंगतीविषयीची चीड व प्रशासनाविषयीचे असमाधान कधी संयमाने, कधी तीव्रतेने तर कधी उपहासात्मक पद्धतीने व्यक्त होत असते. गेल्या पन्नास वर्षांपासून ही जागरूकता वाढत्या प्रमाणात आढळून येते. केवळ नकारात्मक जाणिवेतून पत्रलेखक लिहित नसतात, तर सकारात्मक अनुभूतीचे दर्शन या पत्रलेखनातून होत असते.

गेल्या अर्धशतकात गोमंतकात अनेक जटिल समस्या निर्माण झाल्या आणि त्याचे दूरगामी परिणाम कोणते होणार आहेत याविषयीचे विचारमंथन येथील वृत्तपत्रांतून झालेले आहे. वाढत्या शहर वस्तीमुळे होणारे प्रदूषण, खाण व्यवसायामुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यटक संस्कृतीमुळे होणारे प्रदूषण इत्यादी प्रश्नांचे स्वरूप जनतेच्या निदर्शनास यावे म्हणून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी, विचारवंतांनी आपले विचार प्रकटन केलेले आहे. गेले कित्येक महिने येथील शैक्षणिक माध्यमाच्या प्रश्‍नासंबंधीचे विचारमंथन सुरू आहे.

लोकशिक्षणाबरोबरच सर्जनशील वाङ्‌मयनिर्मितीला प्रोत्साहन देणे हेही वृत्तपत्रांचे कार्य आहे. दिवसेंदिवस वाङ्‌मयीन नियतकालिकांचा वारसा क्षीण झाल्यामुळे ते उत्तरदायित्व आता वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्तींकडे आलेले आहे. ते कार्य त्यांच्याकडून निष्ठेने व तन्मयतेने होत आहे.

गेल्या पन्नास वर्षांत वृत्तपत्रांनी सर्जनपर्व निर्माण केलेले आहे. वृत्तपत्रांतून प्राप्त होणार्‍या ज्ञानाला अनेक मर्यादा असतात. थॉमस कार्लाईल या विचारवंताने वृत्तपत्रीय ज्ञानाला गुडघाभर पाणी म्हटलेले आहे. जीवनकलहाच्या धबडग्यात, घाईगर्दीच्या क्षणी सर्जनशील लेखक – कवींनी ही निर्मिती केलेली असल्यामुळे तिच्यात सखोलतेला वाव नसतो हे खरे. तरीदेखील या माध्यमाचे महत्त्व नगण्य मानून चालणार नाही. ज्वलंत प्रश्नांचा उहापोह करणे, मर्मदृष्टीने जनसामान्यांपर्यंत त्याचे आकलन करून देणे हे वृत्तपत्रीय वैचारिक लेखनाचे उद्दिष्ट असते. गोव्यातील नियतकालिकांनी ते निश्‍चितपणे डोळ्यांपुढे ठेवलेले आहे.

• • •