>> तामिळनाडूत हेलिकॉप्टर दुर्घटना, पत्नीचाही मृत्यू
>> अपघातात १४ पैकी १३ जवानांचेही निधन
देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचे त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. या दुर्घटनेत लष्कराच्या १३ जवानांचेही निधन झाले. रावत यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
काल बुधवारी दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचे एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.
तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगराळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते.
दरम्यान, हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ व्यक्तींचे निधन झाले आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पार्थिव आज दिल्लीत
जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचार्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बिपीन रावत यांचे पार्थिव आज गुरूवारी संध्याकाळी दिल्लीत आणले जाणार आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी बिपीन रावत यांची संरक्षण प्रमुखपदी नियुक्ती होऊन दोन वर्षे पूर्ण होणार होती.
एक अधिकारी बचावला
या अपघातामध्ये वायुसेनेचे एक अधिकारी बचावले असून ते गंभीर जखमी आहेत. वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिंह यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, वरुण सिंह यांची शौर्यगाथा थक्क करणारी आहे. याचवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. वरुण सिंह हे भारतीय हवाईदलातील कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. तेजस हे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापासून त्यांनी वाचवले होते. १२ ऑक्टोबर २०२० रोजी ही घटना घडली होती. तेजस विमानाने उड्डाण घेतले आणि १० हजार फूट उंचीवर विमान पोहोचताच फ्लाइट कंट्रोल सीस्टीम आणि लाइफ सपोर्ट सीस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात येताच प्रसंगावधान दाखवत वरुण सिंह यांनी दुर्घटना टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत विमानाचे सेफ लँडिंग करण्यात यश मिळवले होते. वरुण यांना या कामगिरीसाठी शौर्यचक्र जाहीर करण्यात आले होते.
बिपीन रावत यांच्यासोबत
होते वरिष्ठ अधिकारी
रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. त्यात ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, गुरसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, सतपाल यांचा समावेश होता. या सर्वांना दुर्घटनेत प्राणास मुकावे लागले आहे. हेलिकॉप्टरच्या क्रू मेंबरपैकी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत.
पहिले सीडीएस
तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपीन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी सूत्रे स्वीकारली होती. जनरल रावत हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले आणि त्याच दिवशी त्यांनी संरक्षणप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. २०१९ साली डिसेंबरच्या शेवटून दुसर्या आठवड्यात संरक्षणप्रमुख पदनिर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती. १९९९ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करतात.
रावत यांना यापूर्वीही अपघात
बिपीन रावत यांचा विमान अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे चिता हेलिकॉप्टर दिमापूर, नागालँड येथे क्रॅश झाले होते. बिपीन रावत तेव्हा लेफ्टनंट जनरल होते. आपल्या चिता हेलिकॉप्टरने दिमापूरहून निघाले असताना अचानक काही उंचीवर त्यांचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात रावत किरकोळ जखमी झाले होते.
अनेक पुरस्कार
आपल्या लष्करी सेवेदरम्यान बिपीन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळाले. लष्करात अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
बिपीन रावत यांचा जीवनपट
बिपीन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपीन रावत यांचे वडील एल. एस रावत हे देखील लष्करातच होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले. या अकादमीतील त्यांची चमकदार कामगिरी पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिले सन्मानपत्र मिळाले. त्यानंतर बिपीन रावत हे पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपीन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबर १९७८ रोजी बिपीन लष्करात भरती झाले. त्यांना भारतीय लष्कराच्या गोरखा १ रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून संधी मिळाली. इथूनच त्यांचा लष्करामधील कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर काम केले.
रावत यांच्या निधनाने
प्रचंड वेदना ः पंतप्रधान
बिपीन रावत यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपीन रावत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जनरल बिपीन रावत हे एक अतुलनीय सैनिक होते. एक सच्चा देशभक्त होते. देशाचे लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धोरणात्मक बाबींवर त्यांची मते आणि दृष्टिकोन फार महत्त्वाचे असायचे. त्यांच्या निधनामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. ओम शांती, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
देशासाठी दुःखदायक
दिवस ः अमित शहा
पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून बिपीन रावत यांना श्रद्धांजली दिली आहे. आज देशासाठी एक फार दु:खदायक दिवस आहे. कारण आपण एका दुर्दैवी घटनेमध्ये आपले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना गमावले आहे. ते सर्वात शूर सैनिकांपैकी एक होते. ज्यांनी आपल्या मायभूमीची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. त्यांचं योगदान आणि निष्ठा शब्दांत सांगता येत नाही. असे ट्वीट अमित शाह यांनी केले आहे.
कधीही न भरून येणारे
नुकसान ः राजनाथ सिंह
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून बिपीन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बिपीन रावत यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे देशाचे आणि लष्कराचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असल्याचे ट्वीट राजनाथ सिंह यांनी केले आहे.