सरकार, ‘डीडी’कडून समर्थन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूर येथील भाषण सरकारी वाहिनी असलेल्या दूरदर्शनने प्रसारित केल्याने काल विरोधी पक्षांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याची टीका केली. भाजपने मात्र प्रसारणाचे समर्थन केले.
कॉंग्रेस प्रवक्ते संदीप दीक्षित म्हणाले की, संघासारख्या वादग्रस्त व पक्षपाती संघटनेच्या कार्यक्रमाचे सरकारी वाहिनीने तासभर प्रसारण करणे हा धोकादायक प्रघात आहे. हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर असल्याचे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले. या प्रसारणामुळे सरकारचा ङ्गरिमोट कंट्रोलफ पुन्हा एकदा समोर आल्याचे ते म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने टीका करताना म्हटले की, संघ हिंदुत्त्ववादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी वावरत असतो. राष्ट्रीय वाहिनीने अशा संघटनेच्या प्रमुखाचे भाषण थेट प्रक्षेपित करण्याची काहीच गरज नव्हती. माहिती प्रसारण मंत्रालयाने स्पष्टीकरण देण्याची मागणी कम्युनिस्ट पार्टीने केली. देशाच्या लोकशाही आणि निधर्मी मूल्यांना या प्रसारणामुळे धक्का पोचल्याचे पक्षाने म्हटले.
इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, हा भयानक बहुमतवाद आहे. उद्या इमाम आणि चर्चमधले धर्मगुरूही आपली भाषणे दूरदर्शनने प्रसारित करावीत अशी मागणी करू शकतात. थेट प्रक्षेपणाचे भाजपने समर्थन केले. पक्ष प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या, सरसंघचालक भागवत यांच्या भाषणास बातमीमूल्य आहे, ते काय सांगतात याकडे देशभरातून लक्ष असते. प्रसार भारती स्वायक्त असून बातम्यांच्या निवडीचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. कॉंग्रेस व डावे पक्ष पोपचा संदेश दाखवला जातो त्यावेळी गप्प का असतात, असा सवाल त्यांनी केला. संघाचा राष्ट्रनिर्माणात मोठा वाटा असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे भागवत यांचे भाषण प्रेरणादायी असल्याचे तसेच सामाजिक सुधारणांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधणारे असल्याचे सांगितले. त्यांनी स्वयंसेवकांना स्थापनादिनाच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, दूरदर्शनने म्हटले की, इतर कोणत्याची कार्यक्रमांप्रमाणेच हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. त्यासाठी विशेष योजना नव्हती. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही भाषण प्रसारित करण्यात काहीही गैर नव्हते असे सांगून भाषणात बातमी मूल्य होते असे नमूद केले.
स्वदेशीकडे वळा; जातीभेद संपवा : सरसंघचालक
नागपुर : स्वदेशीला उत्तेजन देण्यासाठी सरकारने नवे विकास मॉडेल अमलात आणावे तसेच हिंदू समाजातील जातीभेद नष्ट व्हावा अशी हाक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल नागपूर येथे बोलताना सांगितले. विजयादशमीच्या संघस्थापनादिन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
नरेंद्र मोदी सरकारचेही त्यांनी कौतुक केले. सरकार योग्य दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे ते म्हणाले. पहिल्यांदाच या सरकारने नव्या भारताच्या आशा पल्लवीत केल्याचे भागवत यांनी सांगितले. सरकारने देशाला स्वावलंबी बनविणारी धोरणे आखावी व उद्यमशीलतेला वाव द्यावा, लोकांनी स्वदेशी उत्पादने वापरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, असे ते पुढे म्हणाले. देशाची सुरक्षा व उत्कर्षासाठी स्वावलंबन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील भेदभाव नष्ट झाले पाहिजेत. भेदभावाला प्रोत्साहन देणार्या समजुती, सवयी, परंपरा, प्रथा या नष्ट व्हायला हव्यात असे त्यांनी सांगितले. हिंदुंमधील जातीभेद नष्ट व्हावा. हिंदू मंदिरे, स्मशानभूमी आणि सामूहिक पाण्याचे स्रोत सर्व हिंदूंना खुले असावे असेही ते म्हणाले.