सरपंच, पंचांच्या मानधनात 2 हजारांची वाढ

0
6

>> राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि पंच सदस्यांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ करण्यास काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
पंचायत सदस्यांच्या मानधन वाढीच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाकाठी अतिरिक्त 2 कोटी 63 लाख रुपयांचा भार पडणार आहे. मानधन वाढीमुळे आता सरपंचांना महिन्याला 8 हजार रुपये, उपसरपंचांना महिन्याला 6 हजार 500 रुपये आणि पंच सदस्यांना महिन्याला 5 हजार 500 रुपये एवढे मानधन मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा ब्रॉडबँड नेटवर्क (जीबीबीएन) सर्व्हिसला आणखी 4 वर्षे मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील सरकारच्या 11 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांचा (आयटीआय) अंदाजे 230 कोटी रुपये खर्चून दर्जा वाढविण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. नवीन उपकरणे आणण्याबरोबर अभ्यासक्रमांचीही फेररचना होणार आहे. टाटा समूह आयटीआयसाठी 160 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. यापैकी 75 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. सरकारकडून 70 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रमासाठी ताज समूहाबरोबर करार करण्यात आला असून, नवीन अभ्यासक्रम 15 जुलैपासून सुरू होत आहे. गुरुवार दि. 11 जुलै रोजी जागतिक कौशल्य दिनानिमित्त कला अकादमीत खास कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कौशल्य अभ्यासक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.