सरदार आणि इंदिरा

0
96

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनीच येणारी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने कॉंग्रेसने आजवर या देशामध्ये जे केले, त्याची काल सव्याज परतफेड केली. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील समस्त क्रांतीवीरांना आणि आपल्या विचारधारेशी न जुळणार्‍या महान नेत्यांना अडगळीत फेकण्याचे जे पाप कॉंग्रेसच्या आजवरच्या सरकारांनी केले, त्याचीच पुनरावृत्ती मोदी सरकारही करते आहे असा संदेश यामुळे देशात जाता कामा नये. पंतप्रधान मोदींनी इंदिरांचा आपल्या भाषणात उल्लेख टाळला नाही हे योग्यच झाले. जगामध्ये जेथे जेथे सत्तांतरे झाली, तेथे तेथे आपल्या राजकीय विरोधकांच्या स्मृती नेस्तनाबूत करण्याचे पुरेपूर प्रयत्न युगायुगांपासून होत आले. परकीय आक्रमकांनी आपल्या देशात लुटालूट केली, तेव्हा येथील संस्कृतीवर घाला घालण्यासाठी मंदिरांवर घण घातले, सांस्कृतिक मानचिन्हे उद्ध्वस्त केली. हाच प्रकार अन्यत्रही घडत आला. आधुनिक काळातही तालिबान्यांना आपली धर्मांधता पुढे रेटण्यासाठी बामियॉंच्या महाकाय बुद्धमूर्ती फोडण्याची गरज भासली आणि इराकमध्ये फौजा घुसवून सद्दामचा निःपात केल्यावर अमेरिकेलाही त्याचे पुतळे उखडावेसे वाटले. जेव्हा एखाद्या विचारधारेचे सरकार जाऊन दुसर्‍या विचारधारेचे सरकार येते तेव्हा आधीच्या नेत्यांचे पुतळे पाडण्यापासून त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाही पुसून टाकण्यापर्यंतचे असे प्रयत्न सर्वत्र होत असतात. परंतु अशा खुणा पुसून टाकल्याने त्या व्यक्तींचे विस्मरण समाजाला होईल हा मात्र भ्रमच ठरतो. प्रत्येक महान व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचे मोजमाप समाज आपापल्या परीने करीत असतो. कोणी कितीही प्रयत्न केले, तरी त्या खुणा पुसता येत नाहीत. पुराणकाळापासून इतिहासकाळापर्यंतच्या सर्व महान व्यक्ती आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठीच भजल्या – पुजल्या जातात. त्यामुळे कॉंग्रेसने जेव्हा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या वेगळ्या पथावरून का होईना, परंतु प्रामाणिकपणे आणि देशनिष्ठेने लढलेल्या समस्त क्रांतीवीरांना जाणीवपूर्वक अडगळीत टाकले आणि नेहरू आणि गांधी घराण्याच्या उदोउदोपुढे इतर नेत्यांना खुजे ठरवण्याचा जो काही प्रयत्न केला, तो होऊनही त्या सार्‍या महान व्यक्तिमत्त्वांप्रती भारतीय समाज सदैव परम आदरच बाळगत आला. क्रांतीवीर भगतसिंगांचे नाव घेतले की समस्त भारतीयांची मान आजही आदराने खाली झुकते. सावरकर असोत, नेताजी सुभाषचंद्र बोस असोत, भगतसिंग – सुखदेव – राजगुरू असोत, त्यांनी देशासाठी केलेला त्याग महानच आहे. त्याला कोणी चार फुले वाहिली नाहीत, तर त्यात ती न वाहणार्‍यांच्या मनाचा कोतेपणा आणि खुजेपणा दिसतो. त्या महान व्यक्तिमत्त्वांची उंची काही त्यामुळे कमी होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर साठ – पासष्ट वर्षांत सत्ताधार्‍यांनी नावही न घेतलेल्या सावरकरांच्या आणि नेताजींच्या जाज्वल्य देशभक्तीला देश सलामच करतो. कोणाला काही वाटो, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनीही या देशासाठी आपले जीवन वाहिले आणि त्यांचेही या राष्ट्रउभारणीमध्ये निश्‍चितच योगदान राहिले आहे. इंदिरा गांधींची हत्या सुवर्णमंदिरामध्ये सैनिकी कारवाई करण्याच्या त्यांच्या आततायीपणाच्या निर्णयामुळे झाली असली तरीही एक राष्ट्रीय समस्या म्हणूनच त्यांनी त्या प्रश्नाच्या सोडवणुकीचा आपल्यापरीने प्रयत्न केला होता. त्यामुळे इंदिरा गांधींचे किंवा राजीव गांधींचे बलिदान हेही देशासाठीचेच बलिदान ठरते आणि त्याबाबत देशाने मनात कृतज्ञताच ठेवली पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशासाठी जे काही केले, ते खरोखरच अजोड कार्य होते. देशाच्या कानाकोपर्‍यातील समस्त सरंजामशाहीवादी संस्थाने खालसा करून घेण्यासाठी नाना वृत्ती – प्रवृत्तीच्या विलासी राजेरजवाड्यांची मने वळवणे आणि त्यांना त्यांच्या संस्थानांसह राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील करून घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. एवढी महद् कठीण गोष्ट लीलया शक्य करून दाखवणार्‍या या पोलादी पुरूषाची आजवर उपेक्षाच झाली. त्यामुळे राष्ट्रीय एकता दिवस या यथोचित कल्पनेतून त्यांना आदरांजली वाहिली गेली हे योग्यच झाले, परंतु त्यासाठी इंदिरा गांधींना अडगळीत फेकणे म्हणजे कॉंग्रेसवाल्यांनी केलेल्या चुकांचीच री ओढण्यासारखे होईल. शेवटी प्रत्येकाच्या कार्यकर्तृत्वाचे मोजमाप करणे समाजावर सोपवावे. त्याला जे काही मूल्यपापन करायचे ते करूद्यात. मात्र, त्यासाठी इतिहासाशी छेडछाड होता कामा नये.