सरत्या वर्षात वाहन अपघातांत 5.47 टक्क्यांनी घट : गोवा पोलीस

0
2

सरत्या वर्षात राज्यातील वाहन अपघातांच्या प्रमाणात 5.47 टक्के घट झाल्याचा दावा गोवा पोलिसांनी केला आहे. गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने 2024 मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3.3 लाख वाहनचालकांना चलन जारी करून सुमारे 20.53 कोटींचा दंड वसूल केला आहे. तसेच, 32 हजार 536 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची वाहतूक खात्याकडे शिफारस केली आहे.

राज्यात 2023 मध्ये 2814 अपघातांची नोंद झाली होती, तर 2024 मध्ये 2660 अपघातांची नोंद झाली. राज्यातील वाढत्या रस्ता अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे. सिग्नल तसेच रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवली जाते. तसेच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी स्पीड गन्सचा अवलंब केला जात आहे.

पोलीस विभागाला 2024 मध्ये 87.98 टक्के गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. 2096 गुन्ह्यांपैकी 87.98 टक्के म्हणजेच 1844 गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला असून, त्यात 29 खून, 100 बलात्कार, 16 दरोडा-चोरी, 29 खुनी हल्ले या प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे. सर्व 29 खून प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले आहे.
राज्यात सरत्या 2024 वर्षात 56 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील 18 प्रकरणांचा छडा लावण्यात सायबर विभागाला यश आले.