सरत्या वर्षात राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या फक्त चर्चा

0
2

>> सरकारी नोकरी घोटाळाही बराच गाजला; सूचना सेठकडून मुलाची हत्या, बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणही राहिले चर्चेत

सरत्या 2024 ह्या वर्षात राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलावर केवळ चर्चा झाली. प्रत्यक्षात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल झालाच नाही. आता, नवीन 2025 वर्षात राज्य मंत्रिमंडळात बदल निश्चितपणे शक्य आहे. 2023 मध्ये राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करून नीलेश काब्राल यांच्या जागी आलेक्स सिक्वेरा यांची वर्णी लावण्यात आली होती. काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काहींना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आलेली आहे. त्यामुळे सरत्या वर्षात राज्य मंत्रिमंडळात फेरबदलासाठी भरपूर राजकीय हालचाली करण्यात आल्या. भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाने राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलांसाठी हिरवा कंदील दाखविला आहे; मात्र प्रत्यक्षात कृती करण्यात आलेली नाही.

सरत्या वर्षात उघड झालेला सरकारी नोकरी घोटाळा बराच गाजला. सरकारी खात्यांतील नोकऱ्यांसाठी पैसे स्वीकारल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. राज्यातील विविध पोलीस स्थानकांत या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन अनेकांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. या घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी भाजपशी संबंध असलेल्या काही व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यामुळे विरोधकांकडून ह्या घोटाळ्यात सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन गोव्यातील सरकारी नोकरी घोटाळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पत्नी गुंतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने डिचोली येथील न्यायालयात संजय सिंह यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून सराईत गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्या पलायनाचे प्रकरण बरेच गाजले. विरोधकांनी सरकारवर सिद्दिकी खान पलायन प्रकरणी भरपूर टीका केली. सिद्दिकी खान पलायन प्रकरणामध्ये आरआरबी पोलीस शिपाई अमित नाईक याला बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सिद्दिकीला केरळमध्ये अटक करण्यात यश मिळविल्याने या प्रकरणावर पडदा पडला. सिद्दिकीने पोलीस कोठडीतून पलायन केल्यानंतर दोन व्हिडिओ व्हायरल करून खळबळ उडवली. एका व्हिडिओमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले होते, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांच्यावर आरोप केले होते.

सरत्या वर्षात जानेवारी महिन्यात सिकेरी कांदोळी येथे हॉटेलमध्ये बंगळूर येथील एआय स्टार्टअपच्या सीईओ सूचना सेठ हिने आपल्याच 4 वर्षाच्या मुलाचे कथित खून प्रकरण केवळ गोवा नव्हे तर देशभर गाजले. या घटनेची वेळीच माहिती पोलिसांना मिळाल्याने गोव्यातून पलायन केलेल्या सूचना सेठ हिला कर्नाटकात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. सूचना सेठ हिच्या बॅगमध्येच तिच्या 4 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. तिच्याविरोधात बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

कुंभारजुवा मतदारसंघातील सांत इस्तेव येथील फेरीबोट धक्क्यावरून कार नदीच्या पात्रात गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी याचा थांगपत्ता अद्यापपर्यंत लागू शकलेला नाही. ही घटना ऑगस्टमध्ये घडली होती. बाशुदेव भंडारीसोबत कारमध्ये असलेली युवती वाचली आहे. जुने गोवे पोलिसांनी पाणबुडे, ड्रोन, नाविक, अग्निशामक दलाच्या मदतीने बेपत्ता बाशुदेव भंडारी याचा नदीपात्रात शोध घेतला होता; मात्र तो सापडू शकला नाही. या प्रकरणाचे तपासकाम गुन्हा विभागाकडे सुपूर्द केले. तथापि, अजूनपर्यंत बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणाचे गूढ कायम आहे.