– मधुरा कुलकर्णी
जगात येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी जगाचा निरोप घेत असतो. दर वर्षी असे अनेक ज्ञात-अज्ञात जीव आपल्यातून निघून जातात. त्यात काही आपले जीवलग असतात, काही परिचित असतात तर कोणी निसटती ओळख असणारे असतात. असे ओळखीचे चेहरे काळाच्या पडद्याआड हरवले की एक अगम्य सुन्नता दाटते. जीव आतल्या आत तुटतो. एखाद्या अपघाताच्या घटनेनंतर परिचितांच्या मृत्यूनंतरही डोळ्यात अश्रूंची दाटी होते. असं असताना कलेनं, कौशल्यानं, विद्वत्तेनं, व्यासंगीपणानं आपल्याला अमाप सुख देऊन गेलेल्यांची निधन वार्ता कानी येते तेव्हा शब्दच अबोल होतात. काळानुरुप आपण पुढे जात राहतो मात्र त्यांचा आठव असतोच. सरत्या वर्षाला निरोप देताना या सर्वांची आठवण येते. नव्या वर्षाचं स्वागत करताना आपण काय गमावलंय या जाणीवेनं मन हळवं होतं. म्हणूनच अशांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. सरत्या वर्षात अनेक दिग्गजांनी आपला निरोप घेतला. त्यातील एक प्रमुख नाव होतं नामदेव ढसाळ. यांच्या लेखनात विद्रोह होता पण तो विध्वंसक नव्हता. शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी ढसाळ कायम झगडत राहिले. दलितांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेकदा आंदोलनं केली. सुरुवातीच्या काळात मार्क्सवादी असणार्या ढसाळ यांच्यावर नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रभाव पडला आणि त्या विचारांनी प्रेरित होऊन सातत्यानं काम केलं. त्यांच्या माघारी हीच विचारधारा घेऊन काम करणारी पिढी त्यांचे वारसदार ठरतीये. नामदेव ढसाळ यांनी लेखन आणि साहित्याच्या प्रांतात केलेली मुशाङ्गिरी दलित चळवळीला नवा आयाम देणारी ठरली. महानगरातले जीवन आणि प्रचलित बोलीभाषा या विषयावर त्यांनी केलेले लेखन मराठी साहित्यातील अमूर्त ठेवा आहे. दलितांचे, शोषितांचे जीवन स्वत: भोगणारा हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, तसेच नाटककार, एवढेच नव्हे तर दलित पँथरसारखी कडवी संघटना स्थापन करून राजकीय क्षेत्र ढवळून काढणारा नेता होता. तो आता काळाच्या पदद्याआड गेला आहे.
‘देवदास’, ‘ममता’, ‘बंबई का बाबू’, ‘आँधी’ आदी मोजक्या चित्रपटांमधून ठसा उमटवणार्या सुचित्रा सेन यांचं या वर्षी निधन झालं. बंगाली चित्रसृष्टीतील ही सम्राज्ञी वेगळेपणाचा ठसा उमटवणारी होती. दिग्दर्शकाची नायिका असूनही समर्पित भावनेनं केलेली त्यांची कलासाधना कधीच लपून राहिली नाही. त्यांना श्रद्धांजली वाहताना प्रत्येक रसिकाचं ऊर भरुन आलं.
सरत्या वर्षानं सुधीर मोघे यांच्यासारख्या मनस्वी कलाकाराला आपल्यातून हिरावून नेलं. यांच्या निधनानं काव्य, संगीत, चित्रकला आदी कलाप्रांतात स्वच्छंद मुशाङ्गिरी करणारा एक कलंदर कलाकार हरपल्याची भावना व्यक्त झाली. शब्द आणि मांडणीतील साधेपणा हे त्यांचे विशेष. शब्दांशी खेळणारा हा कवी रंगांशी त्याच तन्मयतेनं खेळायचा. नवोदितांना प्रोत्साहन देताना त्यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. रुपेरी सृष्टीत राहूनही वलयाचा रंग अंगाला चिकटू न देणार्या या मनस्वी कलाकाराच्या स्मृती कायम स्मरणात राहतील. या वर्षी प्रख्यात लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंग यांच्या निधनानं साहित्यविश्वाला मोठा धक्का बसला. त्यांनी कधी स्वत:चा, स्वत:च्या लेखनाचा ढोल बडवला नाही. त्यांच्या परखड लेखनानं, वक्तव्यांमुळे बरेच वादही निर्माण झाले. पण, त्यामुळे त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. त्यांनी नेहमी मूल्यात्मक गोष्टींचा विचार केला. त्यांच्या निधनानं साहित्यविश्वात पोकळी निर्माण झाली. या वर्षी बेबी नंदाचंही निधन झालं. नर्गीस, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, माला सिन्हा, हेमा मालिनी, नूतन यासारख्या गाजलेल्या नायिका या नंदाच्या समकालीन स्पर्धक. स्पर्धा मोठी होती, मात्र बेबी नंदा नेहमीच आपलं वेगळेपण दाखवत राहिली. प्रतिकूल परिस्थितीचा धीराने सामना करत मास्टर विनायकांची कन्या असलेल्या बेबी नंदाने चित्रपटसृष्टीत आपला अमीट ठसा उमटवला. चित्ररसिक कायमच तिला स्मरतील. यंदा कुलदीप पवार याचंही निधन झालं. त्यांच्या निधनानं मराठी चित्रसृष्टीतील एक प्रेक्षकमान्य खलनायक गेला ही भावना व्यक्त झाली. सरत्या वर्षात अंकुश खाडे उर्ङ्ग बाळू यांच्या निधनाने तमाशाचा आधारवड कोसळला. काळू आणि बाळू हे जुळे भाऊ. यांनी कधी पैशांसाठी काम केलं नाही. त्यांच्यामध्ये असणार्या साधर्म्यामुळे दोघांना एकत्र पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळायची. आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळावा अशी बाळू यांची इच्छा होती. ती कधीच पूर्ण झाली नाही.
एअर इंडियाचे माजी अध्यक्ष, टाटा स्टीलचे माजी व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांची ओळख ‘स्टील मॅन’ अशी होती. त्यांनीही या वर्षी आपला निरोप घेतला. संगीताच्या किमयेने हजारो रसिकांची मनं जिंकणार्या आनंद मोडक यांच्या निधनानं रसिक हळहळले. देशातील क्रिकेटजगतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडूंपैकी आवर्जून नाव घ्यावे असे व्यक्तिमत्त्व असणारे माधव मंत्री सरत्या वर्षात आपल्यातून निघून गेले.जयपूर अत्रौली घराण्याच्या निष्ठावंत गायिका धोंडूताई कुलकर्णीच्या निधनानं रसिकांना निष्ठावंत गानयोगिनी हरपल्याची हळहळ व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन हा सरत्या वर्षात मोठा आघात होता. त्यांच्या जाण्याने एक झंझावातनिमाला. जनतेच्या कल्याणासाठी केल्या गेलेल्या संघर्षाच्या मुशीतून तयार झालेल्या या नेत्याने नेहमीच जनसामान्यांचा कैवार घेतला. हा नेता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत असे. केंद्रात ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी पेलण्यास सिद्ध झालेल्या मुंडे यांचा सुवर्णकाळ सुरु झाला होता. पण, नियतीला ते पटलं नाही. त्यांचं अकाली निधन चटका लावून गेलं. सदाशिव अमरापूकर यांच्या निधनाची बातमी याच वर्षी ऐकावी लागली. त्यांच्यासारख्या कसलेल्या कलाकाराचं निधन चटका लावून गेलं. मुरली देवरा या ज्येष्ठ नेत्याच्या निधनानं कॉंग्रेसला धक्का बसला.
सरत्या वर्षात हुरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणार्या स्मिता तळवलकर, कथ्थक नृत्याचा ‘सितारा’ असणार्या सितारादेवी, बॅ. अ. र. अंतुले, इतरांच्या चेहर्यावर हास्याची कारंजी ङ्गुलवणारे देवेन वर्मा, माजी खासदार आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष असलेले एकनाथ ठाकूर यांच्या निधनाच्या बातम्या सहन कराव्या लागल्या. भारतीय योगकलेच्या प्रचार-प्रसारात मोलाची भूमिका बजावणारे योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांच्या निधनाची बातमी त्यांच्या शिष्यांना विव्हल करुन गेली. भारतीय परंपरा, शास्त्र म्हणून योगाची जोपासना केली पाहिजे असा त्यांचा सततचा आग्रह होता. १९८२ मध्ये गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा ‘गांधी’ हा चित्रपट आला आणि रिचर्ड ऍटनबरो हे नाव सर्वसामान्यांच्या ओठी रुळलं. या वर्षी त्याचं निधन झालं. सर रिचर्ड ऍटनबरो हे कामानं ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व होतं. म्हणूनच रुढार्थानं ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरी कामामुळे कायमच आपल्यात राहतील. विशेषत:‘गांधी’ या चित्रपटामुळे भारतीयांच्या भावविश्वात निर्माण झालेलं त्यांचं स्थान अढळ राहील. तब्बल वीस वर्ष परिश्रम केल्यानंतर निर्माण झालेली ही कलाकृती मैलाचा दगड म्हणूनच अभ्यासली जाईल. सरत्या वर्षात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचं निधन झालं. त्यांचं जाणं साहित्यविश्वात पोकळी निर्माण करुन गेलं. यांचा लोकसंग्रह दांडगा होता. ते नेहमीच माणसे जोडण्याचे काम करत. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.