सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी : ढवळीकर

0
128

राज्य सरकारला मागील अर्थसंकल्पातील भांडवली खर्चातील सुमारे ३० टक्के रक्कमेचा खर्च करण्यास यश प्राप्त झाले नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे राज्य सरकारची न्यायालयातसुद्धा नाचक्की होत आहे. सरकारातील मंत्र्याच्या विरोधात भाजपचे आमदार तक्रारी करीत आहेत, असेही आमदार ढवळीकर यांनी सांगितले.
पाच नगरपालिका क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेत लेखाअनुदान संमत करून विधानसभा तहकूब करण्याची मागणी केली जात आहे. निवडणूक आचारसंहिता असताना विधानसभा अधिवेशन घेणे योग्य होणार नाही, असेही आमदार ढवळीकर यांनी सांगितले.

अर्थसंकल्पामध्ये विविध खात्यांसाठी निश्‍चित केलेल्या खर्चाच्या रकमेचा योग्य प्रमाणात विनियोग केला जात नाही. विविध खात्यांचा भांडवली खर्च २५ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. केवळ बांधकाम खात्याचा भांडवली खर्च ३५ टक्के असल्याचे आमदार ढवळीकर यांनी सांगितले. राज्य सरकारकडून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण न करता नवनवीन विकास कामे हाती घेतली जात आहेत. आदिवासी कल्याण खात्याच्या निधीचा बाजार प्रकल्पासाठी खर्च केला जात आहे. आदिवासी खात्याच्या निधीचा आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी वापर करण्याची गरज आहे, असेही आमदार ढवळीकर यांनी सांगितले.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती बिकट आहे. येत्या २०२२ पर्यत हा कारखाना पुन्हा कार्यान्वित केला जाण्याबाबत साशंकता वाटते. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आमदार ढवळीकर यांनी यावेळी केला.

शिमगोत्सव सात ठिकाणी हवा
राज्य सरकारचा राज्यात केवळ तीनच ठिकाणी शिमगोत्सव साजरा करण्याचा निर्णय अयोग्य आहे. शिमगोत्सव हा ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाचा प्रमुख उत्सव आहे. त्यामुळे बाराही तालुक्यात शिमगोत्सव साजरा करण्याची गरज आहे. राज्य सरकारने किमान सात तालुक्यांत शिमगोत्सवाचे आयोजन करावे. अन्यथा, तीन ठिकाणी आयोजित शिमगोत्सव रद्दबातल करावा, अशी मागणी ढवळीकर यांनी केली.
गोवा विधानसभेच्या सभापतींनी त्यांच्यासमोरील दोन अपात्रता याचिकांवर योग्य निर्णय दिल्यास राज्यात निश्‍चित मध्यावधी विधानसभा निवडणूक होऊ शकते, असे आमदार ढवळीकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.