सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याची गरज

0
17

>> विधानसभेत आमदारांनी मांडल्या शाळांच्या समस्या

>> इमारत दुरूस्तीची सूचना

विधानसभेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अनुदानित मागण्यांवरील चर्चेत आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील सरकारी शाळांच्या समस्या मांडल्या. यात विद्यालयांचा दर्जा सुधारण्यासंबंधी सूचना तसेच विद्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे सांगितले. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मराठी भाषेला योग्य दर्जा देण्याची मागणी केली.

वास्कोतील सरकारी विद्यालयांच्या
इमारती मोडकळीस ः साळकर

वास्को, बायणा येथील सरकारी विद्यालयाच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहे. विद्यालयांच्या जुन्या इमारतींच्या दुरूस्तीची आवश्यकता असल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात बालगुन्हेगारांची संख्या वाढत आहे. बालगुन्हेगारीच्या कारणांचा शोध घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही सांगितले.

मराठी भाषेला योग्य
दर्जा द्या ः डॉ. शेट्ये
राज्यातील ग्रामीण भागांतील मराठी शाळा विविध कारणांमुळे बंद पडत आहेत. आमची संस्कृती, कला टिकविण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन आवश्यक आहे. सरकारने मराठी भाषेला योग्य दर्जा द्यावा, अशी मागणी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी अनुदानित मागण्यांवरील चर्चेत बोलताना केली. डिचोली मतदारसंघातील काही मराठी शाळांची परिस्थिती बिकट बनली आहे. शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. एका शाळेच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षे प्रयत्न केला जात आहे. शालेय मुलांच्या वाहतुकीसाठी बालरथाची व्यवस्था करावी, असेही आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

सत्तरीतील शाळांची
स्थिती बिकट ः राणे

सत्तरीतील अनेक शाळांची स्थिती बिकट बनली असून शाळांच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे असे पर्येेच्या आमदार दिव्या राणे यांनी सांगितले. सत्तरी तालुक्यातील २० शाळांमध्ये तर इंग्रजी शिक्षक नसल्याचेही यावेळी आमदार डॉ. राणे यांनी सांगितले.

केप्यातील विद्यालयांचा
दर्जा सुधारा ः डिकॉस्टा

केपे मतदारसंघातील ङ्गातर्पा, मोरपिर्ला, बार्शे येथील विद्यालयांचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार आल्टन डिकॉस्टा यांनी केले. केपे मतदारसंघातील बर्‍याच विद्यालयात शिक्षकांची कमतरता असल्याचेही आमदार डिकॉस्टा यांनी सांगितले. सरकारी नोकरीसाठी कोकणीची सक्ती करावी अशी मागणी आमदार युरी आलेमांव यांनी केली.

कंत्राटी शिक्षकांना
सेवेत घ्या ः बोरकर

सांतआंद्रे मतदारसंघातील सरकारी शाळांच्या इमारतीची दूरावस्था झाली असून दुरूस्ती करून साधनसुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. यावेळी आमदार बोरकर यांनी, कंत्राटी शिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे, अशीही मागणी केली.