सरकारी महाविद्यालयांत हॉस्टेल्स उभारणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

0
211

गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये केंद्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानातून साखळी, खांडोळा, केपेच्या सरकारी महाविद्यालयासाठी हॉस्टेल्स बांधण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ईडीसी इमारतीतील जीएसआयडीच्या कार्यालयात घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पीडित महिला आणि मुलांसाठी बांबोळी येथे वन स्टॉप सेंटर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंसेला बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय, कायद्याची मदत, मानसिक आधार आणि कायदा सल्ला देण्याची व्यवस्था या सेंटरमध्ये केली जाणार आहे.

मंडळाने आत्तापर्यंत ११० प्रकल्पाची बांधकामे पूर्ण केली आहेत. येत्या मे २०२१ पर्यत नवीन प्रस्ताव हाती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्वरी येथील उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या इमारतीचे बांधकाम येत्या डिसेंबर २०२० पर्यत पूर्ण करणे, गोवा राज्य विधानसभेच्या संकुलाची सात कोटी रुपये खर्चून नूतनीकरण, बांबोळी येथील दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे बैठकीत निश्‍चित करण्यात आले आहे.