सरकारी नोकऱ्यांत 4 टक्के जागा खेळाडूंसाठी राखीव : मुख्यमंत्री

0
12

ताळगावात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा संपन्न

राज्य सरकारच्या सर्व सरकारी खात्यांतील नोकऱ्यांमध्ये राज्यातील खेळाडूंना 4 टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात बोलताना काल केली. राज्य सरकारकडून यापूर्वी केवळ पोलीस आणि अग्निशामक दलातील नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवल्या जात होत्या. आता, राज्य सरकारच्या सर्व खात्यांतील नोकऱ्यांत क्रीडापटूंसाठी 4 टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या समारोप सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, क्रीडामंत्री गोविंद गावडे, मंत्री नीलेश काब्राल, नीळकंठ हर्ळणकर, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, आमदार जेनिफर मोन्सेरात महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री संजय बनसोड, उत्तराखंडच्या क्रीडा मंत्री रेखा आर्या आदींची उपस्थिती होती.
राज्य सरकारकडून क्रीडा विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यातील क्रीडा साधनसुविधांचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. राज्यातील 39 क्रीडा मैदाने ठरावीक खेळांसाठी नामांकित केली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा हे पर्यटन राज्य म्हणून ओळखले जाते. आता यापुढे गोवा क्रीडा स्पर्धांसाठीही ओळखले जाणार आहे. क्रीडा साधनसुविधांचा स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांसाठी वापर केला जाणार आहे. राज्यातील राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधा व मानव संसाधन आम्ही तयार करण्यात यशस्वी झालो आहोत. या क्रीडा सुविधांचा युवा खेळाडूंनी योग्य वापर केला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

राज्यात खासगी क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना आवश्यक पाठबळ दिले जाणार आहे. गोव्यातील क्रीडा विकासासाठी क्रीडा विद्यापीठाची नितांत गरज आहे. क्रीडा विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक आणि इतर तज्ज्ञांची गरज पूर्ण करू शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी दिलेले भक्कम पाठबळ, स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी क्रीडा विकासाचा घातलेला पाया आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी क्रीडा क्षेत्रात उभारलेल्या साधनसुविधांचा वापर करून 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात यश आले, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 37 व्या क्रीडा स्पर्धेत खेळांच्या संख्येतील वाढीचे कौतुक केले. पारंपरिक खेळांच्या परिचयामुळे भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान होण्यास मदत होणार आहे. या पारंपरिक खेळांना ऑलिम्पिकच्या मंचावर योग्य मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पालकांच्या दृष्टिकोनात बदल होत आहे. खेळांमध्ये मुलांच्या व्यापक सहभागाबद्दल पालकांच्या चिंतेचे दिवस गेले. खेळ हा मानवी प्रतिभेच्या अभिव्यक्तीचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग बनला आहे. भारत तंदुरुस्त असेल तरच पुढे जाऊ शकतो, असेही उपराष्ट्रपतींनी सांगितले.

उद्योग क्षेत्राचा क्रीडापटूंना पाठिंबा मिळावा : उपराष्ट्रपती
क्रीडा विकासासाठी क्रीडापटूंना विविध प्रकारे साहाय्याची गरज आहे. क्रीडा विकासासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे. उद्योग व खासगी क्षेत्राने क्रीडापटूंना पाठिंबा दिल्यास आपणाला उत्कृष्ट दर्जाचे क्रीडापटू मिळू शकतात. राज्य सरकारकडून क्रीडापटूंना साहाय्य दिले जात आहे. तसेच, उद्योग आणि खासगी क्षेत्राने क्रीडापटूंना पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात काल केले.

38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये
38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड राज्यात घेण्यात येणार आहे. या क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार डॉ. पी. टी. उषा यांनी सांगितले.