>> आम आदमी पक्ष आवाज उठवणार; नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केले स्पष्ट; न्यायालयीन चौकशीची आग्रही मागणी
गोव्यातील सरकारी नोकरी घोटाळ्याचा मुद्दा आम आदमी पक्ष संसदेत उपस्थित करणार आहे, असे आपचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय सिंह यांनी नवी दिल्ली येथे काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गेले जवळपास दीड महिना राज्यात नोकरी घोटाळा गाजत आहे. या घोटाळ्याप्रकरणी 29 जणांना पोलिसांनी अटक केली होती, तर फसवणुकीचा आकडा 8 कोटींच्या वर पोहोचला होता. तसेच सरकारी नोकरीच्या आमिषाने 100 हून अधिक जणांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. आता हा मुद्दा आम आदमी पक्ष थेट देशाच्या संसदेत उपस्थित करणार असल्याने तो आणखीनच गाजणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्या दरम्यान आपकडून नोकरी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.
गोव्यात आम आदमी पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून, विविध मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवत आहे. सरकारी नोकरी घोटाळा हा गोव्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा असून, सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी त्यात घोटाळ्यात गुंतले आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी केला. या पत्रकार परिषदेला आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
गोव्यात मागील दहा वर्षांपासून सरकारी नोकरी घोटाळा सुरू आहे. गोव्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी भाजप सरकार अपयशी ठरले आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून युवा वर्गाची लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. सरकारी नोकरीच्या नावाखाली दलालांनी कोट्यवधी रुपये उकळले, असेही संजय सिंह म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने सुध्दा नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन गोव्यातील सरकारी नोकरी घोटाळ्यावर आवाज उठवला होता. याशिवाय राज्यातील विरोधी पक्षांच्या 7 आमदारांनी ह्या घोटाळ्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून चौकशीची मागणी केली होती. तथापि, अजूनपर्यंत केंद्रीय पातळीवरून गोव्यातील सरकारी नोकरी घोटाळ्याची दखल घेण्यात आलेली नाही.
न्यायालयीन चौकशीची मागणी करणार
राजकीय पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी घोटाळा गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून, त्यात भाजपमधील काही उच्चपदस्थ नेते आणि मंत्री गुंतल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारच्या दबावामुळे पोलीस यंत्रणा या सरकारी नोकरी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे गोव्यातील सरकारी नोकरी घोटाळ्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करून न्यायालयीन चौकशीची मागणी केली जाणार आहे, असेही आपचे राष्ट्रीय सरचिटणीय संजय सिंह यांनी सांगितले.
दीपश्री सावंतला जामीन मंजूर
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणात पणजी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी दीपश्री सावंत हिला येथील प्रथमवर्ग न्यायालयाने जामीन काल मंजूर केला. नोकरीच्या आमिषाने एका व्यक्तीची 10.35 लाख रुपयांच्या फसवणूक केल्या प्रकरणात दीपश्रीला अटक करून पणजी पोलिसांनी तिची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागून घेतली होती. 10 लाख रुपयांची हमी आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला.