सरकारी खात्यांमध्ये जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत पंचवीस ते तीस सरकारी खात्यांनी जनसंपर्क अधिकार्यांची नियुक्ती करून त्याबाबत माहिती व प्रसिद्धी खात्याकडे माहिती पाठविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव सुधीर महाजन यांनी २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सर्व सरकारी खाती आणि स्वायत्त संस्था यांना एक परिपत्रक पाठवून जनसंपर्क अधिकार्यांची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. २० दिवसांत जनसंपर्क अधिकार्यांची नियुक्ती करावी. जनसंपर्क अधिकारी खात्याचा जबाबदार राजपत्रित अधिकारी असला पाहिजे, अशी सूचना केली आहे.
या परिपत्रकाची दखल घेऊन आत्तापर्यंत पंचवीस ते तीस पेक्षा जास्त सरकारी खात्यांनी जनसंपर्क अधिकार्यांची नियुक्ती करून माहिती व प्रसिद्धी खात्याला लेखी स्वरूपात कळविले आहे. बहुतांश खात्यांनी पीआरओ नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु, त्या खात्यांच्या प्रमुखांकडून अधिकृत माहिती पोहोचलेली नाही. सरकारच्या सर्व खाती आणि स्वायत्त संस्थांच्या जनसंपर्क अधिकार्यांच्या माहितीचे संकलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सरकारच्या खाते प्रमुखांनी जनसंपर्क अधिकार्यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे सविस्तर नाव, ई मेल, मोबाईल क्रमांक ही माहिती सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याला पाठविण्यास सुरुवात केली आहे. माहिती व प्रसिद्धी खाते आणि सरकारी खाती यांच्यात योग्य समन्वय साधण्याच्या उद्देशाने जनसंपर्क अधिकारी नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आहे. याचा लाभ पत्रकारांना सुध्दा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.