पुढील तीन महिने सर्व सरकारी खात्यांना अर्थसंकल्पातील तरतुदींतील 20 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही, अशी माहिती देणारे परिपत्रक काल वित्त खात्याने काढले. वरील काळात कोणतीही नवी पदे निर्माण करता येणार नसून भरतीही करता येणार नाही. येत्या 31 मार्चपर्यंत संगणक, वाहने, कार्यालयांसाठीचे फर्निचर, तसेच एसी, पंखे आदी सामानाचीही खरेदी करता येणार नसल्याचे परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. वित्त खात्याचे अवर सचिव प्रणव भट यांनी मंगळवारी वरील परिपत्रक काढले. नव्या अर्थंसंकल्पासाठी तीन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना सरकारी खात्यांना वरीलप्रमाणे खर्च कपातीचे निर्बंध लागू केले जातात. मात्र, हे निर्बंध कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, व्याजाची बिले, कर्जाची परतफेड यासाठी लागू नसल्याचे परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.