सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा गृहकर्ज योजना

0
8

योजना लवकरच कार्यान्वित; मुख्यमंत्र्यांची माहिती; पर्वरीत ‘कौटिल्य लेखा भवन’चे उद्घाटन

कोरोनाच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेली गृहकर्ज योजना बंद करण्यात आली होती. या योजनेनुसार गृहकर्जाचा व्याजदर अत्यंत कमी होता. ती योजना बंद करण्यात आल्याने कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते. आता ही योजना पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली जाणार आहे. नवीन गृहकर्ज योजना साधी, सोपी आणि सुटसुटीत असेल. काल पर्वरी येथे ‘कौटिल्य लेखा भवन’च्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी माहिती दिली.

पर्वरीतील कौटिल्य या लेखा भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, जीएसआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, वित्त खात्याचे प्रधान सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, लेखा संचालक दिलीप हुमरस्कर, जिल्हा पंचायत सदस्य कविता गुपेश नाईक, सरपंच स्वप्नील चोडणकर उपस्थित होते.

गोव्याचा आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा स्वीकारून लेखा खात्याच्या नवीन इमारतीसाठी कौटिल्य हे नाव निवडण्यात आले आहे. कौटिल्य, चाणक्य यांनी देशाला अर्थनीती दिली. खऱ्या अर्थाने देशाची अर्थनीती कशी असावी हे त्यांनी दाखवून दिले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पर्वरीत लेखा भवन आल्यामुळे आर्थिक कामे झटपट होतील; कारण संचालक येथेच उपलब्ध होणार आहेत. पर्वरीचा विकास झपाट्याने होत आहे, असे रोहन खंवटे म्हणाले.

सर्व सरकारी कार्यालये लवकरच कॅशलेस
सध्या काही सरकारी खात्यांमध्ये कॅशलेस पेमेंट सुविधा सुरू झाली आहे. येत्या काळात सर्व सरकारी कार्यालयांत रोखीने व्यवहार बंद केले जातील. केवळ ऑनलाईन पद्धतीने पेमेंट स्वीकारले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.