सरकारी कर्मचार्‍यांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाचा शुभारंभ

0
85
राजभाषा संचालनालय पणजीतर्फे ईडीसीच्या सभागृहात सरकारी कर्मचार्‍यांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ. प्रमोद सावंत. बाजूस निता तोरणे, डॉ. प्रकाश वझरीकर व उर्मिला गावडे.

प्रशासनात मराठीच्या वापरासाठी प्रयत्न
कोकणीबरोबरच मराठी भाषेचाही प्रशासनात जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नरत असून या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजभाषा संचालनालयाचे संचालक प्रकाश वजरीकर यांनी काल सरकारी कर्मचार्‍यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना स्पष्ट केले.एखाद्या सरकारी कार्यालयाला मराठीतून पत्र आले तर त्या पत्राचे उत्तर मराठीतूनच दिले जावे. तसेच सर्व सरकारी कार्यालयातील फलक कोकणी बरोबरच मराठी भाषेतूनही तयार करण्याचा प्रस्ताव आहे. पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी येणार्‍या तक्रारदाराने जर आपली तक्रार मराठीतून लिहिली जावी अशी मागणी केली तर ती पूर्ण केली जावी असा प्रस्ताव आहे.
या पार्श्‍वभूमीवर गोवा सरकारच्या प्रशासनात यापुढे कोकणीबरोबरच मराठीचाही जास्तीत जास्त वापर केला जाणार असल्यानेच कर्मचार्‍यांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याच्या वर्गांचे आयोजन करण्यात येत असल्याचे वजरीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे या नात्याने यावेळी बोलताना आमदार प्रमोद सावंत यांनी सरकारी कर्मचार्‍यांना कोकणी व मराठी या भाषा शुद्ध लिहिता आल्या पाहिजेत. भाजप सरकारने कोकणी व मराठी या प्रादेशिक भाषांचा प्रशासनात जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी प्रयत्न चालवले असल्याचे ते म्हणाले.
या मराठी भाषा प्रशिक्षण वर्गात सुमारे ५० सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.